ऑक्सिजन निर्मितीच्या ठिकाणी जनरेटर बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:17+5:302021-05-05T04:39:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात सात ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेटरचे काम लवकर ...

ऑक्सिजन निर्मितीच्या ठिकाणी जनरेटर बसवा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात सात ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेटरचे काम लवकर पूर्ण करून त्याठिकाणी विद्युत जनरेटर बसवावा, तसेच जिल्ह्यातील कोविड काळजी केंद्र, कोविड आरोग्य केंद्र या ठिकाणीही जनरेटर बसवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प उभारणीबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘महावितरणने प्रकल्पासाठी स्वतंत्र जोडणी देण्याबाबत ट्रान्सफॉर्मर द्यावा. लवकरात- लवकर काम सुरू करावे. विद्युत पुरवठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विद्युत जनरेटर बसवावेत. उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज याठिकाणी तत्काळ जनरेटर बसवावा. त्याला ऑटो स्विच असावा.’’
जिल्ह्यतील सर्व कोविड काळजी केंद्र, कोविड आरोग्य केंद्राच्या ठिकाणीही जनरेटर बसवण्यात यावा. त्या ठिकाणचा वीज पुरवठा, तेथील सुरक्षा याबाबतही महावितरणने पाहणी करावी.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उप-जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता सी.ए. गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, पाटबंधारे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, तहसीलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर उपस्थित होत्या.
--
फोटो 04052021-कोल-ऑक्सिजन बैठक
ओळ: कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा आढावा घेतला.