जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी
By Admin | Updated: June 9, 2016 01:20 IST2016-06-09T00:16:45+5:302016-06-09T01:20:35+5:30
‘कन्यागत’ची तयारी : नृसिंहवाडी येथे घेतला आढावा

जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी
नृसिंहवाडी : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आॅगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळासाठी १२१ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ यातील पहिल्या टप्प्यातील ६५ कोटींच्या विविध विकासकामांची बुधवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ़ सैनी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रस्त्याचे डांबरीकरण, विठ्ठल मंदिर, यात्री निवास, शुक्लतीर्थ घाट, पापविनाशिनी घाट, नृसिंहवाडी बस स्थानक, मंदिर प्रवेशावरील काँक्रीट रस्ता, प्राथमिक आरोग्य केंद्र हॉल, तात्पुरती पार्किंग व्यवस्था या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांकडून कामाची माहिती घेतली़ काही ठिकाणी स्वत: जागेची मापे टाकून खात्री करून घेतली़, तर पापविनाशिनी घाटाजवळ गावचे सांडपाणी नदीत मिसळणे, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्याचे नियोजन करण्याबाबत कडक सूचना दिल्या़ माहेश्वरी परिसरातील रस्त्याबाबत संबंधित ठेकेदाराची चांगलीच कानउघडणी केली़ या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार बुरूड, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सचिन गिरी, कुरुंदवाडचे सपोनि कुमार कदम, शिरोळचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम उपस्थित होते़
कन्यागतसाठी शासनाने जो निधी दिला आहे, तो या भागाचा विकास व्हावा, तसेच येथे पर्यटन वाढावे, येथे येणाऱ्या यात्रेकरूंना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिला आहे़ त्यामुळे ही कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी संबंधित ठेकेदार कामे व्यवस्थित करतात की नाही, कामाचा दर्जा याबाबत शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत यांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी सैनी यांनी येथे होणाऱ्या कामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही़, अशा संबंधितांना सूचना दिल्या़
कन्यागत कामाबाबत व नियोजनाबाबत उपसरपंच धनाजीराव जगदाळे, राहुल पुजारी, संजय पुजारी, शशिकांत पुजारी, राजेश खोंबारे, सोमनाथ पुजारी, कृष्णा गवंडी, गुरुदास खोचरे, ठेकेदार दीपक कबाडे, रवी गायकवाड, गुरुप्रसाद रिसबूड यांनी माहिती दिली़ यावेळी मंडल अधिकारी ए़ डी़ पुजारी, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी अतुल पाटील, अश्विन डुणुंग, अभिजित जगदाळे, आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
अधिकारी धारेवर : कामाबाबत सूचना
जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी कन्यागतसाठी मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण व्हावीत याबाबत या कामाचे ठेकेदार, विविध विभागांचे शासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. पुढील कामांच्या सुधारणांबाबत त्यांनी यावेळी सूचना दिल्या़