कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाची पाहणी
By Admin | Updated: July 1, 2016 23:41 IST2016-07-01T21:08:05+5:302016-07-01T23:41:30+5:30
अहवालाकडे लक्ष : प्रवीण किडे यांच्यासह पथकाकडून शहानिशा

कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाची पाहणी
इचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाच्या कामाची पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी पथकासह शुक्रवारी पाहणी केली. यावेळी परिसरातील तक्रारदार नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर हा पूल मंजूर झाला असल्याने अधिकाऱ्यांनी यातून तत्काळ मार्ग काढून पुलाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिल्या.
कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू झाले. कॉलम उभारल्यानंतर पुलाची संभाव्य उंची लक्षात आली. या उंचीचा पूल उभारल्यास या मार्गाला येऊन मिळणारे दोन रस्ते बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या परिसरातील काही ग्रामस्थांनी पुलाची उंची कमी करावी, अशी मागणी केली. मंजूर झालेल्या पुलाची उंची कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत मक्तेदार व हातकणंगले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी या मार्गावरून होणाऱ्या ऊस व यंत्रमाग उद्योगातील वाहनांना मार्गाची व्यवस्था करा, अशी मागणी केली. त्यामुळे पुलाचे
काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक एस. आर. साळोखे, कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पाहणीनंतर कोणता निर्णय घेतला जातो? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
रस्ता निकृष्ट दर्जाचा : पावसाळ्यात कसरत
चंदूरसह रुई व कबनूरच्या वाढीव वसाहतींकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरील नागरिकांची पुलाचे काम तटल्याने गैरसोय होऊ लागली. पर्यायी निर्माण करण्यात आलेला तात्पुरता रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते.
या पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करत रास्ता रोकोसह विविध आंदोलने करून आमदार सुरेश हाळवणकर यांना निवेदने देण्यात आली. त्यावर हाळवणकरांनी परिसरातील नागरिकांचे म्हणणे व पुलाच्या उंचीसंदर्भातील तांत्रिक अडचणी तपासून पाहून मार्ग काढून तत्काळ पूल बांधावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.
त्यानुसार पुणे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता किडे यांनी शुक्रवारी पाहणी करून परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.