प्रकल्पाच्या नेमक्या किमतीसाठी आग्रह धरा

By Admin | Updated: February 25, 2015 00:04 IST2015-02-24T23:52:59+5:302015-02-25T00:04:04+5:30

टोल विरोधी कृती समिती : आज मुंबईत त्रयस्थ मूल्यांकन समितीची बैठक

Inspect the project's exact price | प्रकल्पाच्या नेमक्या किमतीसाठी आग्रह धरा

प्रकल्पाच्या नेमक्या किमतीसाठी आग्रह धरा

कोल्हापूर : वादग्रस्त रस्ते प्रकल्पाची किंमत ठरविण्यासाठी नेमलेल्या संतोषकुमार समितीची पहिली बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. टोल रद्दच्या दिशेने शासनाकडून होत असलेल्या हालचालीचा हा महत्त्वाचा ठप्पा आहे. महापालिकेने मूल्यांकन समितीपुढे प्रकल्पाची मूळ किंमत व अपूर्ण कामाचा जोरदार पाठपुरावा करावा, अशी मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांना केली.रस्ते प्रकल्पाचे ‘आयआरबी’ला पैसे भागविण्याचे पर्याय सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री (विशेष उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती नेमली. या समितीने संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प खर्च ठरविण्यासाठी पाच त्रयस्थ तज्ज्ञांची उपसमिती नेमली. ही समिती कोल्हापुरातील प्रकल्पाचा प्रत्यक्ष दौरा करून प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविणार आहे. दौऱ्याचा आराखडा ठरविण्यासाठी या उपसमितीची पहिली बैठक मुंबईत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात होत आहे. बैठकीसाठी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक वास्तूविशारद राजेंद्र सावंत हे समिती सदस्य म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समितीपुढे महापालिकेने अपूर्ण कामे, प्रकल्पाचा दर्जा, युटिलिटी शिफ्टींगमुळे होणारा जादाचा खर्च आदी मुद्दे ठोसपणे मांडावेत, अशी मागणी आयुक्तांसमोर केली. महापालिका टोलप्रश्नी आवश्यक ती सर्व काळजी घेईल, प्रशासनास याबाबत सक्त सूचना केल्या आहेत, असे आयुक्त शिवशंकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते.

Web Title: Inspect the project's exact price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.