कलबुर्गी हत्याप्रकरणी दोघांची चौकशी
By Admin | Updated: September 5, 2015 00:20 IST2015-09-05T00:20:04+5:302015-09-05T00:20:04+5:30
यांना ताब्यात घेतल्यामुळे कलबुर्गी यांच्या हत्त्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कलबुर्गी हत्याप्रकरणी दोघांची चौकशी
बेळगाव : ज्येष्ठ विचारवंत व माजी कुलगुरु डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी बेळगाव कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री यांच्यासह कन्नड युवा वेदिकेचे अध्यक्ष अनंत ब्याकूड यांची शुक्रवारी पोलिसांनी कसून चौकशी केली. बजंत्री व ब्याकूड यांचे अनैतिक संबंध जाहीर करूनयेत, यासाठी ब्याकूडने कलबुर्गी यांना धमकी दिल्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या अनुषंगाने तपास करणाऱ्या कर्नाटक सीआयडी पोलिसांनी बजंत्री व ब्याकूड यांना ताब्यात घेतल्यामुळे कलबुर्गी यांच्या हत्त्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या सांस्कृतिक उपसंचालिका बजंत्री (धारवाड) व कन्नड युवा वेदिकेचे अध्यक्ष ब्याकूड (मूळ गाव रायबाग, सध्या रा. बेळगाव) यांचे अनैतिक संबंध आहेत. बेळगाव येथील कुमार गंधर्व रंग मंदिरात अश्लील चाळे करताना त्यांना डॉ. कलबुर्गी यांनी रंगेहात पकडले होते. या अनैतिक संबंधांबाबत कुठेही वाच्यता करू नये, यासाठी ब्याकूडने कलबुर्गी यांना धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, बजंत्री यांची मंगलोरला बदली झाली होती. मात्र, पुन्हा त्या बेळगावला रुजू झाल्या होत्या. याबाबतची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांनी या दोघांनाही चौकशीसाठी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले होते. दिवसभर त्यांची सखोल चौकशी सुरू होती. ब्याकूडचे वडील कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त पांडुरंग राणे व ‘सीआयडी’चे बंगलोर पोलीसप्रमुख एस. राजाप्पा दिवसभर बजंत्री व ब्याकूड यांची चौकशी करीत होते. (प्रतिनिधी)