तावडेची कर्नाटक सीआयडीकडून चौकशी
By Admin | Updated: September 8, 2016 00:54 IST2016-09-08T00:54:05+5:302016-09-08T00:54:33+5:30
पानसरे, कलबुर्गी हत्याप्रकरण : अधिकाऱ्यांत समन्वय बैठक, तावडेला आज सत्र न्यायालयात हजर करणार

तावडेची कर्नाटक सीआयडीकडून चौकशी
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याकडे ‘एसआयटी’चे अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कसून चौकशी करीत आहेत. बुधवारी सकाळी कर्नाटकचे राज्य गुन्हे अन्वेषणचे विशेष पोलिस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर व ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांची मुख्यालय परिसरातील ‘पोलिस क्लब’ इमारतीमध्ये तपासासंबंधी समन्वय बैठक झाली. यावेळी निंबाळकर यांनी संशयित तावडे याच्याकडे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी तीन तास स्वतंत्रपणे गोपनीय चौकशी केली. त्यानंतर ते टीमसह बेळगावला रवाना झाले.
दरम्यान, तावडेच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्याला आज, गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर हजर केले जाणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती तपास अधिकारी सुहेल शर्मा करणार आहेत.
पानसरे हत्येप्रकरणी तावडेकडे ‘एसआयटी’ची चार पथके स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत. तावडेच्या स्प्लेंडर मोटारसायकलीचा शोध घेण्यासाठी पथकांनी त्याच्या पनवेल येथील निवासस्थानावर व ‘सनातन’ आश्रमावर छापे टाकले असता मोटारसायकल मिळून आली नाही. ती गायब झाल्याने त्याच्यावरील संशय बळावला आहे. यासंबंधी तावडेकडे चौकशी केली असता तो माहिती देण्यास तयार नाही. पोलिसांना पानसरे हत्येसाठी वापरलेले पिस्तूल, मोटारसायकल व गोळी झाडणारे दोघे यांची माहिती तावडेकडून हवी आहे. या हत्येसंबंधी त्याला व समीर गायकवाडला पूर्ण माहिती आहे; परंतु ते यासंबंधी काहीच माहिती देत नसल्याने तपास पुढे सरकलेला नाही. पोलिसांना या तिन्ही गोष्टी हस्तगत करणे गुन्ह्याच्या दृष्ठीने महत्त्वाचे असल्याने त्यावर जास्त भर दिला आहे.
दरम्यान, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांची वेळ सकाळची आहे. रेकी करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. तिन्ही गुन्ह्यांची पद्धत एकच आहे. तसेच आरोपीदेखील दोघेच आहेत. त्यांनी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल कर्नाटक फॉरेन्सिक लॅब पोलिसांनी दिला आहे.
या अनुषंगाने गेल्या चार दिवसांत तावडेच्या चौकशीत डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी काही माहिती पुढे आली आहे का, हे पाहण्यासाठी कर्नाटकचे विशेष पोलिस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर बारा अधिकाऱ्यांच्या पथकासह सकाळी अकरा वाजता मुख्यालयातील ‘पोलिस क्लब’ येथे आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी त्यांनी तपासासंबधी समन्वय साधला. त्यानंतर निंबाळकर यांनी संशयित तावडेकडे डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी सुमारे तीन तास चौकशी केली. यावेळी तावडेने त्यांना समाधानकारक माहिती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोठडीत त्रास होतोय...
तावडेला भेटण्यासाठी त्याच्या वकिलांना सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे; परंतु गेले दोन दिवस पोलिसांनी अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना भेट दिली नव्हती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास राजारामपुरी पोलिस ठाण्यात अॅड. इचलकरंजीकर यांना तावडेची भेट घालून दिली. यावेळी तावडेने आपणाला गेले चार दिवस ‘सीबीआय’चा पोलिस रवी पाटील व पोलिस निरीक्षक अमृत देशमुख मारहाण करीत आहेत. पोलिस कोठडीमध्ये विश्रांतीसाठी चटई दिली आहे. पांघरुणासाठी चादर दिलेली नाही.
पोलिस महासंचालकांनी घेतली दखल
संशयित डॉ. तावडे याला चौकशीदरम्यान मारहाण होत असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस महासंचालकांकडे बुधवारी केली. त्यावर महासंचालकांनी तावडेला मारहाण करू नये, त्याला सुरक्षा द्यावी, अशा सूचना ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांना देऊ, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी ह. भ. प. बापूमहाराज रावकर, वैभव राऊत, राजेंद्र सावंत, अॅड. संजीव पुनाळकर, प्रभाकर भोसले, नैना भगत, रमेश शिंदे उपस्थित होते, अशी माहिती अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली.