संदेशातील आरोपाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:13+5:302021-04-16T04:25:13+5:30
कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’ अशा पाठवलेल्या खळबळजनक संदेशातील ...

संदेशातील आरोपाची चौकशी सुरू
कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’ अशा पाठवलेल्या खळबळजनक संदेशातील आरोपांची सखोल चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पो. नि. काळे यांची प्रकृती सुधारली असून त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून स्पेशल रूममध्ये स्थलांतरित केले आहे.
कामातील कसुरी अहवाल आणि पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठांनी शिफारस केली नसल्याच्या नैराश्येतून विमानतळ सुरक्षेत असलेले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी बुधवारी पहाटे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याचा खळबळजनक संदेश पाठवला होता. त्या संदेशामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचाही उल्लेख केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने यंत्रणा सक्रिय केली. मोबाइल लोकेशनद्वारे पो.नि. काळे हे पोलिसांना वारणा नदीच्या पुलानजीक नशेत बेशुद्धावस्थेत मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना गुरुवारी अतिदक्षता विभागातून बाहेर स्पेशल रूममध्ये स्थलांतरित केले आहे.
दरम्यान, पो. नि. काळे यांनी नशेत पाठवलल्या संदेशातील आरोपांची सखोलपणे चौकशी सुरू केली आहे, त्याबाबत लवकरच अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.