‘प्राप्तिकर’कडून ‘त्या’ रकमेची चौकशी सुरू
By Admin | Updated: March 17, 2016 23:52 IST2016-03-17T23:24:27+5:302016-03-17T23:52:21+5:30
मुल्ला कोडोली पोलिसांच्या ताब्यात : वारणा शिक्षक कॉलनी चोरी प्रकरण

‘प्राप्तिकर’कडून ‘त्या’ रकमेची चौकशी सुरू
कोल्हापूर : वारणानगर (ता.पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीत सापडलेल्या व मिरजेतील संशयित मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला याच्या मेहुणीच्या घरातील सापडलेल्या रकमेची चौकशी कोल्हापुरातील प्राप्तिकर (आयकर) अप्पर निदेशक (अन्वेषण) कार्यालयाकडून सुरू करण्यात आल्याचे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांची प्राप्तिकर विभागामार्फत चौकशी होणार आहे. एवढे पैसे त्यांनी आणले कोठून याची शहानिशा करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
मार्च एडिंग असल्यामुळे प्राप्तिकर कार्यालयात लगबग सुरू आहे. या कार्यालयाला रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पत्र मिळाले आहे. मात्र, प्राप्तिकर कार्यालयाने याची चौकशी सुरू केली आहे पण, ही रक्कम पोलिसांकडून ताब्यात घेतलेली नसल्याचे प्राप्तिकरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परंतू या प्रकारची चौकशी ही गोपनीय पध्दतीने होत असल्याचे सांगून त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
शिक्षक कॉलनीतील सापडलेले पैसे ताब्यात घ्यावेत, यासाठी बुधवार (दि. १६) कोडोली पोलीसांनी सायंकाळी कोल्हापुरातील प्राप्तिकर कार्यालयाला पत्र पाठविले. मैनुद्दीन मुल्लाने सांगली पोलिसांना हे पैसे वारणेच्या शिक्षक कॉलनीमधून साथीदारासमवेत चोरी केल्याचे तपासात सांगितले होते. त्यानुसार सांगली पोलिसांनी वारणानगर येथे छापा टाकला असता आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये सापडले. गुरुवारी रात्री संशयित मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन मुल्ला याला कोडोली पोलिसांनी या चोरीप्रकरणी अटक केली. मैनुद्दीन मुल्ला याचा ताबा घेण्यासाठी गुरुवारी सकाळी कोडोली पोलिस सांगलीला रवाना झाले. त्याची मिरजेतील गुन्ह्याची पोलिस कोठडीची मुदत संपणार आहे. दुपारी कोडोली पोलिसांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित मैनुद्दीन मुल्ला याला सांगली पोलिसांकडून ताब्यात घेतले.