घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी
By Admin | Updated: May 22, 2015 00:14 IST2015-05-22T00:01:00+5:302015-05-22T00:14:07+5:30
‘लाचलुचपत’कडे तक्रार करा : शिवसेनेची मागणी

घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी
कोल्हापूर : महानगरपालिकेतील घरफाळा विभागात झालेल्या घोटाळ्यात केवळ शिपाई, लेखनिकांची चौकशी न करता त्या विभागाचे अधिकारी, उपायुक्तांचीही चौकशी करावी. त्याबरोबर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत खात्याकडे तक्रार करावी, अशी मागणी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. घरफाळा विभागातील एका कर्मचाऱ्यावर फौजदारी करण्याचे आदेश मागच्या आयुक्तांनी देऊनही हे आदेश कोणी दाबून ठेवले आहेत, असाही जाब यावेळी विचारला.
गुरुवारी सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त शिवशंकर यांची भेट घेतली. महानगरपालिकेतील घोटाळ्याला सर्वस्वी संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारी व प्रशासनातील कारभारी जबाबदार आहेत. गलेलठ्ठ पगार असूनसुद्धा ज्या संस्थेत काम करतो, ती संस्थाच लुटून संपवायची, हे एकमेव धोरण अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न होण्यामागे काही पदाधिकाऱ्यांचे त्यांच्यासोबत असणारे लागेबांधे हेच प्रमुख कारण आहे, असे पवार यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
माजी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी घोटाळ्यास जबाबदार कर्मचाऱ्यावर फौजदारीचे आदेश दिले, परंतु बिदरी यांच्या बदलीनंतर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आदेश बासनात गुंडाळले. अशा अधिकाऱ्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी केली.
मागण्यांचे निवेदनही आयुक्तांना दिले. घरफाळा सवलत योजना रहिवासी मिळकतीसाठी असताना व्यापारी मिळकतींनासुद्धा दिली अशा व्यापारी मिळकतधारकांची यादी प्रसिद्ध करावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी, एचसीएल कंपनीच्या चुकीमुळे थकबाकी रक्कम कमी झाली, त्यामुळे सदर कंपनीचीही चौकशी करावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
शिष्टमंडळात रवी चौगुले, दिलीप पाटील-कावणेकर, हर्षल सुर्वे, नगरसेवक राजू हुंबे, संभाजी जाधव, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, दिलीप जाधव, संजय जाधव, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, रणजित आयरेकर, कमलाकर जगदाळे, शुभांगी साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)