समाजकल्याणच्या वसतिगृह गैरकारभाराची चौकशी करा
By Admin | Updated: January 19, 2015 00:20 IST2015-01-18T23:01:34+5:302015-01-19T00:20:47+5:30
भारतीय दलित महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

समाजकल्याणच्या वसतिगृह गैरकारभाराची चौकशी करा
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातील अनुदानित वसतिगृहातील गैरकारभाराची व गैरसोयींची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्यावतीने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातील भ्रष्ट व बेजबाबदार प्रशासनामुळे मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून, त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यात ४५ अनुदानित वसतिगृहे असून, त्यांना समाजकल्याण विभागाकडून कोट्यवधींचे अनुदान मिळते. विद्यार्थ्यांची संख्या १४०० असून, त्यांना दरमहा ९०० रुपये अनुदान दिले जाते. असे असतानाही वसतिगृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. बहुतेक वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा अभाव आहे. शिवाय त्यांना मिळणारे अन्नसुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यांना मिळणारे अनुदान काही ठिकाणी लाटण्याचा प्रयत्न केला जातो. अशा भ्रष्ट व बेजबाबदार प्रवृत्तींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.