केडीसीसीतील लाखावर खात्यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 01:15 IST2017-02-15T01:15:29+5:302017-02-15T01:15:29+5:30
नाबार्ड पथकाची कारवाई; नोटाबंदी काळात ५० हजारांवर रक्कम भरलेली खाती

केडीसीसीतील लाखावर खात्यांची चौकशी
कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा झालेल्या १ लाख ३ हजार खात्यांची ‘नाबार्ड’च्या पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे. प्रत्येक खात्यांची ‘केवायसी’ पूर्ततेची चौकशी केली जाणार असून गेले दोन दिवस मुख्य कार्यालयात पथक ठिय्या मारून आहे. मंगळवारी त्यांनी करवीर, कागल, राधानगरी तालुक्यातील शाखांची मुख्य कार्यालयात बसून चौकशी केली.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या नोटा जिल्हा बँकेने सुरुवातीच्या काळात स्वीकारल्या, पण १३ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. या कालावधीत २७० कोटी रुपये जमा झाले होते. करन्सी चेस्ट बँकांनी ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने रिझर्व्ह बँकेने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून चौकशी केली. ज्या खात्यांवर दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली अशा अकरा शाखांची तपासणी केली. बँकेने प्रत्येक खात्यांची केवायसी पूर्ततेबाबतची माहिती ‘नाबार्ड’ला सादर केली. तोपर्यंत जिल्हा बँकेने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने ही रक्कम स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले. आदेश देऊन तीन आठवड्यांचा कालावधी झाला तरी ही रक्कम अद्याप बँकेतच पडून आहे. या रकमेवरील लाखो रुपये व्याजाचा भुर्दंड बॅँकेला सहन करावा लागत आहे.
या रकमेची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅँकेने ‘नाबार्ड’ला दिले. त्यानुसार सोमवारपासून ही तपासणी सुरू झाली असून ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा झालेल्या सर्व खात्यांची केवायसी पूर्तता पाहिली जाणार आहे. आज, बुधवारपर्यंत मुख्य कार्यालयात तपासणी करून त्यानंतर शाखांच्या पातळीवर तपासणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
शाहूवाडी, पन्हाळ्यातील शाखांची आज चौकशी!
आज, बुधवारी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील शाखांची जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातच तपासणी केली. गुरुवारी भुदरगड व शिरोळ तालुक्यांत जाऊन शाखांची तपासणी करणार आहे. शुक्रवारी उर्वरित तालुक्यांत जाऊन तपासणी करून रिझर्व्ह बँकेला अहवाल देणार आहे.