साहाय्यक निबंधकची चौकशी करा
By Admin | Updated: March 9, 2015 23:50 IST2015-03-09T23:22:49+5:302015-03-09T23:50:48+5:30
श्रीपतराव शिंदे : गडहिंग्लजमध्ये जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मागणी

साहाय्यक निबंधकची चौकशी करा
गडहिंग्लज : सहकार खात्याच्या गडहिंग्लज साहाय्यक निबंधक कार्यालयात उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याचे पुरावे आहेत. आरोप खोटा ठरला, तर शिक्षा भोगू. मात्र, जनतेला वेठीला धरणाऱ्या साहाय्यक निबंधक ए. एच. भंडारे यांची सहकारमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी सोमवारी केली.शहरातील श्री राम मंदिरात जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गडहिंग्लज, हेब्बाळ, हुनगिनहाळ व अत्याळ येथील सेवा संस्था निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार झाला. गडहिंग्लज शहर व तालुका आणि आजरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.शिंदे म्हणाले, डॉ. दाभोळकर व कॉ. पानसरे यांच्या खुनात साधर्म्य असल्यामुळे त्या पाठीमागील जातीयवादी शक्तींचा बंदोबस्त करायला हवा.मेळाव्यास प्रा. स्वाती कोरी, श्रीपती कदम, बाळासाहेब मोरे, भीमराव पाटील, पापा चौगुले, बसवराज खणगावे, नितीन देसाई, सज्जन तोडकर, मारुती संती, संजय रोटे, शिवानंद घस्ती, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमच्या दणक्यानेच पुलास मंजुरी
तारेवाडी पुलासाठी जनता दलाने वेळोवेळी आंदोलने केली. नरसिंगराव पाटील यांच्यासह तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. आमच्या दणक्यामुळेच तारेवाडी पुलास मंजुरी मिळाल्याचा दावा अॅड. शिंदेंनी केला.
नेसरीत उपोषणाला बसणार
हेब्बाळ जलद्याळ येथील पीडित महिलेची तक्रार घेण्यास नेसरीचे पोलीस टाळाटाळ करीत आहेत. कारवाई न झाल्यास नेसरी पोलीस ठाण्यासमोर स्वत: उपोषणाला बसणार आहोत, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
शिंदे म्हणाले,
‘एव्हीएच’ प्रकल्पाच्या उत्पादनाला कायमची बंदी घालावी व आंदोलकांवर कोणतीही कारवाई करू नये.
शेतकरीविरोधी व भांडवलदारधार्जिणा भूसंपादन कायदा रद्द करावा.
चित्रीचे पाणी गडहिंग्लजच्या पूर्व भागालाही मिळावे यासाठी लढा उभारणार.
६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी.