नावीन्य जपणारा, कष्टाळू चर्मकार समाज

By Admin | Updated: December 21, 2015 00:28 IST2015-12-21T00:13:49+5:302015-12-21T00:28:18+5:30

'कोल्हापुरी' चप्पलची निर्मिती : स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटलीसह भारतभर कोल्हापूरचा नावलौकिक

Innovator, hardworking leather society | नावीन्य जपणारा, कष्टाळू चर्मकार समाज

नावीन्य जपणारा, कष्टाळू चर्मकार समाज

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर -चमार किंवा चर्मकार हे शब्द ‘चर्मकार’ या संस्कृत शब्दापासून झाले आहेत. यांचा मूळ प्रांत बिहार व संयुक्त प्रांत आहे. भारतामधील सर्व भागांत हा समाज दिसून येतो. या समाजाचा प्रामुख्याने कातड्याचे चप्पल व इतर वस्तू तयार करणे हा व्यवसाय आहे. याकडे कष्टाळू व प्रामाणिक समाज म्हणून पाहिले जाते. कोल्हापुरी चप्पल तयार करून या समाजाने कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले आहे. या समाजातील अनेकजण श्री संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचे अनुयायी आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये या समाजाचे लोक आढळतात. कोल्हापूर शहरातील सुभाषनगर, जवाहरनगर, शिवाजी मार्केट परिसरात हा समाज मोठ्या प्रमाणात राहतो. चामड्यापासून चप्पल तयार करणे हा पारंपरिक व्यवसाय समाजाने आजही जपला आहे. काळाची गरज ओळखून पारंपरिक व्यवसायात न अडकता त्यामध्ये नवनवीन आधुनिक बदल करून या समाजाने स्वत:सह आपल्या उत्पादनांमध्ये नवीन बदल करून समाजाचा विकास साधला आहे.
प्रचंड जाहिरातबाजी करून अनेक कंपन्या आपल्या मालाला बाजारपेठ मिळविण्याकरिता धडपडतात. मात्र कोणत्याही प्रकाराची प्रसिद्धी, जाहिरातबाजी न करता गुणवत्तेवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा दर्जा व वैशिष्ट्ये टिकवून राहिलेले पादत्राण म्हणजे आपली ‘कोल्हापुरी चप्पल’ होय. याच समाजाने कोल्हापुरी चप्पलचे निमित्त करून कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले आहे.
महाराष्ट्रात राजस्थानी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. जयपुरी चढाव जरी जवळजवळ नाहीसे झाले असले तरी कोल्हापुरी चपला मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरून दिलेली.
कोल्हापुरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळ्यातसुद्धा तिच्यात थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही; कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. कोल्हापूर जिल्ह्णात या चपला तयार करून उपजीविका करणारी साधारणत: सात हजारांवर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते. सध्या मात्र या व्यवसायात चामड्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलांच्या निर्मिर्तीच्या प्रमाणात घट होत आहे. चामड्याच्या वाढत्या किमती हेही यामागील कारण आहे. याही परिस्थितीत कोल्हापुरी पुडा - कापशी, कोल्हापुरी खास कापशी, कुरुंदवाडी, बारा वेणी, कर्रकर्र वाजणारी, मेहरबान कोल्हापूर या चपलांना मागणी आहे.
स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या विदेशांसह भारतात सर्वत्र कोल्हापुरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. त्यासाठी इथल्या उद्योजकांना निमंत्रणे येतात. इथे येणारे पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत, हे जरी खरे असले तरी सद्य:स्थितीत कातड्याची टंचाई जाणवत असल्याने या व्यवसायातील कामगार वर्गावर कठीण परिस्थिती आल्याचे दिसून येत आहे. तरी या समाजाने नावीन्य जपत आपला व्यवसाय टिकविला आहे. समाजाने आता व्यवसायासोबत शिक्षणाची कास पकडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


वैदिक वाङ्मयात उल्लेख
माणसाने जे काही शोध लावले, त्यांतील पादत्राणांचा शोधही महत्त्वाचा. पायांना बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा, उन्हाच्या चटक्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायांना पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पद्धत होती. नंतरच्या काळात मृत प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायांना बांधले जाई. भारतातील पादत्राणांसंबंधी वैदिक वाङ्मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्यांचं साम्य आढळतं. ही पादत्राणे तयार करण्याचे मुख्य काम हा चर्मकार समाज करीत आहे.


संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचे आचरण समाजातील अनेकजण करतात. समाजातील ६० टक्के लोकांनी आपला पारंपरिक व्यवसाय जपला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या समाजाला सध्या घरघर लागली आहे. शासनाने आर्थिक मदत करून या व्यवसायास उभारी देणे गरजेचे आहे.
- भूपाल शेटे,
महापालिका नगरसेवक


समाजातील अस्ताला चाललेली किंवा लोप पावत चाललेली ही कला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी समाजातील सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन तिला पाठबळ देण्याची नितांत गरज आहे. समाजाने शासकीय पातळीवरील विविध योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे.
- अरुण सातपुते, उद्योजक


चर्मकार समाजाने आजही आपला पारंपरिक व्यवसाय जपला आहे. कोल्हापुरी चप्पल तयार करून या समाजाने कोल्हापूरची एक वेगळी ओळख जगभर केली आहे. या व्यवसायात नवीन पिढी येण्यासाठी शासनाने विशेष तरतुदी केल्या पाहिजेत.
- अशोक गायकवाड, उद्योजक

Web Title: Innovator, hardworking leather society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.