मराठी भाषिकांवरील हल्ल्याचा निषेध
By Admin | Updated: July 28, 2014 23:18 IST2014-07-28T22:14:32+5:302014-07-28T23:18:45+5:30
कोल्हापूर : येळ्ळूर येथे कर्नाटक पोलिसांकडून तेथील मराठी भाषिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचे पडसाद जिल्ह्याभर ;निदर्शने, निषेध सभा,

मराठी भाषिकांवरील हल्ल्याचा निषेध
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे कर्नाटक पोलिसांकडून तेथील मराठी भाषिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचे पडसाद आज, सोमवारी जिल्ह्याभर उमटले. संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, निषेध सभा, प्रतीकात्मक दहन अशा निषेधाचे सूर उमटले.
गडहिंग्लजमध्ये निषेध
गडहिंग्लज : येळ्ळूर येथे मराठी भाषिकांना कर्नाटकी पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा व कर्नाटक सरकारचा येथील विविध पक्ष व संघटनांनी तीव्र निषेध नोंदविला.
शिवसेनतर्फे प्रांत कार्यालयास दिलेल्या निवेदनात मराठी भाषिकावर झालेल्या मारहाणीचा कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारने जाब विचारावा, अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख सागर कुराडे, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दयानंद पाटील, सुरेश हेब्बाळे, तानाजी जाधव, संजय जीजगोंडा, अमर रणदिवे, राजू मिरजे, आदींचा समावेश होता.भारतीय जनता पक्षातर्फे ‘कर्नाटक पोलीस प्रशासन व कर्नाटक सरकारचा धिक्कार असो’ या शब्दांत निषेध नोंदविला. शिष्टमंडळात उपाध्यक्ष संदीप नाथबुवा, शहराध्यक्ष आनंद पेडणेकर, शहर उपाध्यक्ष नितीन पाटील, संतोष गायकवाड, मनिष हावळ, सुनील भालेकर, मकरंद कुलकर्णी, आदींचा समावेश होता.महेश सलवादे युवा गु्रपतर्फे निषेध नोंदविला. शिष्टमंडळात महेश सलवादे, शशांक पाटील, नईम मुल्ला, भरत कांबळे, अक्षय तरवाळ, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
कोल्हापूर जनशक्तीतर्फे शिवाजी चौकात निदर्शने
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे कर्नाटक पोलिसांकडून तेथील मराठी भाषिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी कोल्हापूर जनशक्ती संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘कर्नाटक शासनाचा धिक्कार असो...खाकी वर्दीतील गुंंडांचा धिक्कार असो...’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आज दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौक येथे सर्व कार्यकर्ते एकवटले. यावेळी कार्यकर्त्यांकडून भर पावसात कर्नाटक शासनाने केलेल्या कृत्याचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी सरचिटणीस समीर नदाफ यांनी, मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आता केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. तसेच कर्नाटक सरकार बरखास्त करण्याचे धाडसी पाऊलही उचलावे, असे सांगितले.
शासनाच्या या कृत्याला विरोध करणाऱ्या ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. शासनाने माणुसकीच्या सर्व सीमा पार करत हा अत्याचार चालविला आहे, असे संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले.
आंदोलनात अरुण अथणे, केशव स्वामी, ईश्वरप्रसाद तिवारी, एम. डी. कुंभार, समीर जमादार, बादशहा सय्यद, विवेक वोरा, दिलीप पाटील, बाळासाहेब शारबिद्रे, संतोष आयरे, रियाज कागदी, आदी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
इचलकरंजीतही मोर्चा, निदर्शनेइचलकरंजी : येळ्ळूर (जि.बेळगाव) येथे कर्नाटक राज्याच्या पोलिसांनी घराघरांत घुसून अमानुष मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातील शिवाजी पुतळा चौकात शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून निदर्शने केली. कर्नाटक सरकारचा प्रतीकात्मक पुतळा पायदळी तुडविण्यात आला.
येळ्ळूर गावात पोलिसांनी मराठी बांधवावर अमानुष लाठीहल्ला केला. याचा शिवसेनेने निषेध केला. येथील शिवसेना शाखेच्यावतीने शहरप्रमुख धनाजी मोरे, उप जिल्हाप्रमुख मलकारी लवटे, नगरसेवक महादेव गौड, सयाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्यालयापासून मोर्चा काढला. हा मोर्चा शिवाजी पुतळा चौकात आल्यानंतर तेथे जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामध्ये शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)