रक्तसाठ्याची माहिती आता फलकावर
By Admin | Updated: April 22, 2015 00:28 IST2015-04-22T00:00:57+5:302015-04-22T00:28:59+5:30
सीपीआरमध्ये बैठक : कोल्हापूर जनशक्ती आंदोलनाचे फलित

रक्तसाठ्याची माहिती आता फलकावर
कोल्हापूर : रोजच्या-रोज खासगी रक्तपेढ्यांसह येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)विविध रक्तगटांची माहिती फलकावर लावण्याचा निर्णय मंगळवारी सीपीआर प्रशासन व रक्तपेढी यांच्या प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांच्या दालनात निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) विलास पी. देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी याप्रश्नी कोल्हापूर जनशक्ती या संघटनेने आंदोलन केले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून या प्रश्नांसह चार मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
‘कोल्हापूर जनशक्ती’चे समीर नदाफ म्हणाले, शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान शिबिरात अथवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास (ब्लड डोनर कार्ड) देण्यात येते. पण, काही खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तदाता कार्ड घेऊन येणाऱ्या नागरिकांना विविध नियम सांगून त्यांच्याकडून नाममात्र शुल्क वजा करून त्या रक्ताचे पैसे घेण्याचे प्रकार होत आहेत. रक्तांचे दर विविध रक्तपेढीत वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी ३०० रुपये, तर ४०० रुपये घेतले जातात, तर काही ठिकाणी रक्त पूर्णपणे मोफत दिले जाते, अशी उदासीनता का ? सर्व रक्तपेढ्यांमध्ये सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यासाठी एकच दर असावेत. त्याचबरोबर रक्तपेढ्यांच्या प्रशासनाने रोजच्या-रोज रक्तसाठ्याचा फलक लावावा व राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून (एस.बी.टी.सी.) रक्तपेढ्यांबाबत काय मार्गदर्शक सूचना आहेत, त्याची माहिती सीपीआर प्रशासनाने मागवावी व परिषदेकडे पत्रव्यवहार करावा, असे समीर नदाफ यांनी सांगितले.
त्यावर विलास पी. देशमुख यांनी रक्तपेढ्यांना काय नियम लागतात याची माहिती एस.बी.टी.सी.कडून घेतली जाईल, त्याचबरोबर खासगी रक्तपेढ्यांच्या कीट अनुदानाबाबत पत्रव्यवहार करू, ठराविक कालावधीत सर्व रक्तपेढ्यांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्याच्या सूचना करू तसेच रक्तदाता कार्डधारकांना त्वरित रक्त द्यावे, असे देशमुख यांनी सांगितले. बैठकीस अमरनाथ पाटील, डॉ. अर्जुन सुतार, प्रीती रजपूत, प्रकाश घुंगुरकर, संदीप तोंदले, डॉ. आर. सी. चिंचणीकर, डॉ. नकाते, डॉ. बागडी, जीवन ढेरे या रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींसह तय्यब मोमीन उपस्थित होते.(प्रतिनिधी)