माहिती अधिकारात ‘बांधकाम’चा सावळागोंधळ

By Admin | Updated: March 12, 2015 23:55 IST2015-03-12T21:12:29+5:302015-03-12T23:55:41+5:30

एकाच योजनेची दोघांना दिली वेगळी माहिती : शिरढोण, टाकवडे पाणी योजनेतील नुकसानभरपाईच्या रकमेत तफावत

In the information authority, the shakyagandal of 'construction' | माहिती अधिकारात ‘बांधकाम’चा सावळागोंधळ

माहिती अधिकारात ‘बांधकाम’चा सावळागोंधळ

कुरूंदवाड : राष्ट्रीय ग्रामीण नळ  पाणीपुरवठा योजनेतून शिरढोण व टाकवडे (ता. शिरोळ) गावांसाठी कृष्णा नदीतून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या पाईपलाईनसाठी रस्त्याची खुदाई केल्याने नुकसान भरपाईपोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दोघा तक्रारदारांना वेगवेगळी माहिती दिली आहे. यामध्ये तब्बल ३० लाख रूपयांचा फरक असून यातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यापासून सुटका मिळावी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शिरढोण व टाकवडे गावाला कृष्णा नदीतून पाणी योजना केली जात आहे. दोन गावांसाठी स्वतंत्र योजना असताना एकाच चरीतून केलेली पाईपलाईन, निविदेप्रमाणे कामात त्रुटी, अशा विविध कारणांतून ही योजना गाजत असून, योजनेचे काम रडत-खडत चालू आहे. मात्र, याचा विरोध अद्याप संपला नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नुकसान भरपाईच्या सावळागोंधळाने वादात भर पडली आहे.
या योजनेतील पाईपलाईनसाठी रस्त्याकडेने खुदाई केल्याने रस्त्याचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्याच्या नुकसान भरपाई पोटी किती रकमेचा दंड करण्यात आल्याची माहिती टाकवडे येथील मारूती जनवाडे यांनी माहिती अधिकारात २२ आॅगस्ट २०१४ ला मागणी केल्यानुसार जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाने कुरूंदवाड ते शिरढोण २४०० मीटर व कुरूंदवाड ते टाकवडे ८५०० मीटर असा एकूण दहा हजार ९०० मीटर रस्त्याचे नुकसान झाले असून, प्रत्येक मीटरला २७५ प्रमाणे २९ लाख ९७ हजार पाचशे रुपयांसह एकूण ३२ लाख १५ हजार ५०३ रूपये दंड केला. तर सदाशिव पाटील यांनी २० जानेवारी १५ ला बांधकाम विभाग कोल्हापूरकडे मागणी केल्यानंतर रस्त्याचे केवळ ५० मीटरच नुकसान झाले असून दोन लाख २५ हजार ५६३ रूपये दंड आकारल्याचे माहिती दिली आहे.
पाणीपुरवठा विभागात प्रत्यक्षात एक लाख ३३ हजार ९६३ रूपये सार्वजनिक विभागाकडे भरले आहेत. एकाच विभागाने माहिती
अधिकारातून दोन वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईची माहिती दिल्याने तसेच त्यामध्ये तब्बल ३० लाखांचा फरक असल्याने नुकसान अचानक कमी होण्यामध्ये काय गौडबंगाल आहे, असा सवाल आंदोलनकर्ते करत आहेत. त्यामुळे यामध्ये काहीतरी पाणी मुरत असल्याचा आरोप करत योजनेविरोधी आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम विभागालाच धारेवर धरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)


...तर आमचा विरोधच
गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पाणी योजना महत्त्वाची आहे. केवळ योजना पूर्ण होण्यापेक्षा ती टिकावू होणे गरजेचे आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार करत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत कुचकामी योजना होत असेल, तर त्याला आमचा विरोधच राहील.
- अमोल चौगुले, उपसरपंच ग्रामपंचायत टाकवडे

कोणताही गैरव्यवहार नाही
योजनेमुळे रस्ता कॉँसिंग, साईटपट्ट्या याचा अंदाजे खर्च दाखविला आहे. ही नुकसान भरपाई नसून रस्त्यांचे नुकसान संबधित ठेकेदाराने पूर्ण करून द्यावयाची आहे. रकमेच्या तफावतीमध्ये गैरव्यवहार नाही. रस्त्याच्या खर्चाच्या मूल्यांकनाचे अधिकार बांधकाम विभागाकडेच आहेत. रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम पाणीपुरवठा विभागाने बांधकाम विभागाकडे भरली आहे.
- कुमार गुळवे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, जयसिंगपूर

Web Title: In the information authority, the shakyagandal of 'construction'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.