पुरातून पोहत जाऊन बदलला फुटलेला इन्सुलेटर
By Admin | Updated: July 28, 2014 00:01 IST2014-07-27T23:28:50+5:302014-07-28T00:01:14+5:30
‘महावितरण’च्या उचगावातील कर्मचाऱ्यांचे धाडस

पुरातून पोहत जाऊन बदलला फुटलेला इन्सुलेटर
वसगडे : पुराच्या पाण्यात सुमारे दोनशे फूट पोहत जाऊन उचगाव (ता. करवीर) येथील ‘महावितरण’च्या दोघा कर्मचाऱ्यांनी अकरा के.व्ही. विद्युत पोलवरील फुटलेला पिन इन्सुलेटर बदलला. अविनाश आडनाईक व रोहित पटेकर अशी या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या जिगरबाज कार्याचे कौतुक होत आहे.
बापट कॅम्प उपकेंद्रातून उचगाव, तावडे हॉटेल, तसेच निगडेवाडी परिसरासाठी विद्युत पुरवठा केला जातो. शुक्रवारी सायंकाळी या उपकेंद्राच्या सदोष वाहिनीमुळे संपूर्ण विद्युत पुरवठा बंद झाला. उचगाव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब संपूर्ण वाहिनी तपासली असता लोणार वसाहत ते तावडे हॉटेल दरम्यानच्या अकरा के. व्ही. पोलवर पावसामुळे पिन इन्सुलेटर फुटल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.
पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने व रस्त्यापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर हा पोल असल्याने रात्री पाण्यात जाणे जोखमीचे होते; मात्र महावितरणचे जिगरबाज कर्मचारी आडनाईक व पटेकर जिवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने रात्री नऊ वाजता दोनशे फूट अंतर पोहत गेले.
पोलवर चढून त्यांनी खराब इन्सुलेटर बदलल्याने संपूर्ण परिसर १५ मिनिटांत प्रकाशमय झाला. उचगावचे शाखा अभियंता अशोक जगताप, हुपरीचे उपकार्यकारी अभियंता विनोद माने यांनी आडनाईक व पटेकर यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी डी. बी. मिसाळ, एम. एस. गायकवाड, आर. डी. लोहार, एस. एच. भोई उपस्थित होते. (वार्ताहर)