इंदुताई पाटणकर यांचे निधन

By Admin | Updated: July 14, 2017 22:52 IST2017-07-14T22:52:28+5:302017-07-14T22:52:28+5:30

इंदुताई पाटणकर यांचे निधन

Indutai Patankar dies | इंदुताई पाटणकर यांचे निधन

इंदुताई पाटणकर यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी

लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई पाटणकर (वय ९३) यांचे शुक्रवारी रात्री आठ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कासेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
इंदुताई पाटणकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२५ रोजी इंदोली (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथे झाला. त्यांचे वडील दिनकरराव निकम देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यामुळे घरातूनच त्यांना क्रांतिकारक विचारांचा वारसा मिळाला. दहा-बारा वर्षांच्या असल्यापासूनच इंदुताई ‘व्होलगा ते गंगा’सारखी पुस्तके वाचू लागल्या. त्यामुळे ‘क्रांती’च्या विचारांनी त्यांना प्रेरित केले. लहान वयातच त्या काँग्रेसच्या सभेत भाग घेऊ लागल्या. इंदोली येथील आपल्या घरी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या कुटुंबांना त्यांनी मोठा आधार दिला. कऱ्हाड येथे राष्ट्र सेवा दलाच्या उपक्रमातही त्या सहभागी होऊ लागल्या. १९४२ मध्ये, वयाच्या केवळ १६ व्या वर्षी त्यांनी आपल्या पित्याचे घर सोडून दिले. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात त्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्या. त्यांनी महिलांना संघटित केले. १९४२ पासून त्या प्रति सरकारच्या भूमिगत चळवळीत सहभागी होऊ लागल्या.
१ जानेवारी १९४६ रोजी त्यांनी क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्याशी विवाह केला. दोघेही "प्रति सरकार"चे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. डॉ. बाबूजी पाटणकर यांच्याबरोबर इंदुतार्इंनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये स्वत:ला वाहून घेतले. शिक्षणाचे महत्त्व जाणून कासेगाव एज्युकेशन सोसायटी स्थापना केली. कासेगावात या संस्थेचे पहिले हायस्कूल आझाद विद्यालय सुरू केले. या विद्यालयाच्या त्या पहिल्या महिला विद्यार्थी बनल्या. नंतर येथे ज्ञानदानाचे कार्यही त्यांनी केले.
स्वातंत्र्यानंतर इंदुताई आणि बाबूजी हे दोघेही सोशॅलिस्ट पार्टीचा एक भाग बनले. १९४९ मध्ये सैद्धांतिक व राजकीय मतभेदांमुळे ते अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचा भाग बनले. नंतर १९५२ मध्ये ते कम्युनिस्ट विचारांनी काम करू लागले. बाबूजी पाटणकर यांच्या हत्येनंतर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यात सहभाग घेतला. ज्याप्रमाणे माहेरी इंदोली येथील त्यांचे घर कम्युनिस्ट कार्याचे केंद्र होते. त्याचप्रमाणे सासर कासेगाव हेही चळवळीचे एक केंद्र बनले. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.
वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत त्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सक्रिय लढा देत होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या पश्चात मुलगा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, स्नुषा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गेल आॅमवेट, नात प्राची असा परिवार आहे. शनिवार दि. १५ रोजी सकाळी १० वाजता कासेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Indutai Patankar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.