जिल्ह्यातील उद्योग आजपासून पूर्ववत सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:55+5:302021-05-24T04:21:55+5:30

यावर्षी कोरोना असला, तरी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कामांचे प्रमाण चांगले आहे. राज्य शासनाने दि. १५ एप्रिलपासून लागू केलेल्या ...

Industries in the district will resume from today | जिल्ह्यातील उद्योग आजपासून पूर्ववत सुरू होणार

जिल्ह्यातील उद्योग आजपासून पूर्ववत सुरू होणार

यावर्षी कोरोना असला, तरी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कामांचे प्रमाण चांगले आहे. राज्य शासनाने दि. १५ एप्रिलपासून लागू केलेल्या संचारबंदीमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत उद्योग सुरू होते. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने दि. १६ मेपासून लागू केलेल्या आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये उद्योजक, कारखानदार सहभागी झाले. गेल्या आठ दिवसांत औद्योगिक क्षेत्रातील सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. पुन्हा लॉकडाऊन वाढविल्यास औद्योगिक क्षेत्राला ते परवडणारे नाही. त्यामुळे उद्योग सुरू करण्याची भूमिका उद्योजकांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतली. त्यानुसार शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतींमधील अत्यावश्यक सेवेतील, निर्यात करणारे उद्योग आणि त्यांना विविध उत्पादनांचा पुरवठा करणारे कारखाने तीन शिफ्टमध्ये सोमवारपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. दरम्यान, रविवारी कारखान्यांमध्ये साफसफाई, तर कामगारांना सोमवारी कामावर येण्याबाबतची सूचना कारखान्यांच्या व्यवस्थापनांकडून देण्याचे काम सुरू होते.

उद्योजकीय संघटनांचे अध्यक्ष काय म्हणतात?

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील उद्योग सोमवारपासून पूर्ववत सुरू होतील. आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेली कामे यापुढील किमान चार सोमवारी उद्योग सुरू ठेवून पूर्ण करण्याचे नियाेजन आहे.

-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅॅक.

जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी ज्या पद्धतीने उद्योग सुरू होते. त्याप्रमाणे सोमवारपासून उद्योग सुरू होतील. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले जाईल.

-गोरख माळी, अध्यक्ष, मॅॅक.

अत्यावश्यक सेवेतील, कृषीपूरक, निर्यात करणाऱ्या उद्योगांना लागणाऱ्या अन्य, उत्पादने, साहित्यांचा पुरवठा करणाऱ्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग शिवाजी उद्यमनगरसह अन्य औद्योगिक वसाहतींमध्ये आहेत. हे उद्योग शासन नियमानुसार सुरू होतील.

-सचिन मेनन, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन.

चौकट

कामगारांच्या अँटिजन टेस्टचे नियोजन

औद्योगिक वसाहतींमधील वीजपुरवठा दरसोमवारी सुरू ठेवण्याचे महावितरणने मान्य केले आहे. कामगारांच्या अँटिजन टेस्ट, लसीकरणाचे नियोजन गोशिमासह अन्य उद्योजकीय संघटनांकडून केले जाणार असल्याचे गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी सांगितले.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

वसाहत उद्योग कामगार

शिवाजी उद्यमनगर ८५० १५०००

शिरोली १००० ३००००

गोकुळ शिरगाव ८०० १५०००

कागल-हातकणंगले ४५० ४००००

Web Title: Industries in the district will resume from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.