औद्योगिक न्यायालयाचा आदेश गडहिंग्लज कारखान्याला मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:22+5:302021-01-17T04:22:22+5:30
गडहिंग्लज : औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त कामगारांची थकीत रक्कम देण्यास कारखाना तयार आहे, अशी माहिती अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज ...

औद्योगिक न्यायालयाचा आदेश गडहिंग्लज कारखान्याला मान्य
गडहिंग्लज :
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त कामगारांची थकीत रक्कम देण्यास कारखाना तयार आहे, अशी माहिती अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
दरम्यान, शनिवारी तिसऱ्या दिवशीही
सेवानिवृत्त कामगारांनी थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीच्या मागणीसाठी येथील प्रांतकचेरीसमोर धरणे आंदोलन केले. कामगारांची मागणी रास्त असून आपलाही आंदोलनाला पाठिंबा आहे; परंतु वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांची दिशाभूल केली जात असल्याची टिप्पणीदेखील शिंदेंनी केली.
शिंदे म्हणाले, ब्रिस्क कंपनीला
कारखाना चालवायला देईपर्यंत निवृत्त झालेल्या कामगारांची देणी कारखान्याने द्यावीत आणि चालवायला दिल्यानंतर निवृत्त झालेल्या कामगारांची देणी कंपनीने
द्यावीत, असा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. करारातदेखील ते नमूद आहे; परंतु त्या आदेशाविरुद्ध कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणे किंवा सामोपचाराने तोडगा काढणे हाच पर्याय आहे, कामगारांची थकीत रक्कम मिळाली पाहिजे, यात दुमत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.