इंडस्ट्रिया तिसऱ्या दिवशी हाऊसफुल्ल
By Admin | Updated: November 24, 2014 23:58 IST2014-11-24T23:41:12+5:302014-11-24T23:58:57+5:30
उद्योजकांचा प्रतिसाद : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानांचे दर्शन

इंडस्ट्रिया तिसऱ्या दिवशी हाऊसफुल्ल
कोल्हापूर : लहान नटबोल्ट ते तब्बल ६६ लाखांच्या हायड्रोलिक एक्सलेटर (पोकलँड) पर्यंतचा समावेश असलेल्या ‘इंडस्ट्रिया २०१४’ प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, सोमवारी औद्योगिक वसाहतींची साप्ताहिक सुटी असल्याने उद्योजक, कर्मचाऱ्यांनी औद्योगिक, उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी, पाहण्यासाठी गर्दी केली होती.
कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, अर्थमुव्हिंग असोसिएशन, क्रिएटिव्हज् आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रिया २०१४’चे आयोजन केले आहे. येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावरील या प्रदर्शनात औद्योगिक, उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानांचे दर्शन घडत आहे. यात ६६ लाखांचा हायड्रोलिक एक्सलेटर, आठ लाखांचा मिनी रोबट सॅडप्लॅन, बारा प्रकारच्या विटा तयार करणारे मशीन, तसेच वेदनाशामक असणारे २२ हजार रुपयांचे मशीन, स्लॅप फोडणारे दीड लाखांचे कटर, आदींचा समावेश आहे.
सांगलीतील राजारामबापू इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सायकल लक्ष्यवेधक ठरत आहे. चालविण्यास सुलभ व आरामदायी अशी तिची रचना केली आहे. नेहमीच्या सायकलींपेक्षा तिच्या चाकांमध्ये अधिक अंतर आणि ती जास्त लांब आहे. जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित वसाहत, शिवाजी उद्यमनगर, आदी औद्योगिक वसाहतींमधील उद्योग, कंपन्यांनी उत्पादित केलेली यंत्रे प्रदर्शनात आहेत. त्यातून कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादनांची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रदर्शनाला भेट दिलेल्या आमदार महाडिक यांचे स्वागत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने व अर्थमुव्हिंग असोसिएशनचे भैयासाहेब घोरपडे यांनी केले. यावेळी रिलायन्स पॉलिमर्सचे सत्यजित भोसले, क्रिएटिव्हजचे सुजित चव्हाण, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : अमल महाडिक
‘इंडस्ट्रिया’ हे प्रदर्शन आधुनिक औद्योगिक जीवनशैलीशी नाते सांगणारे आहे. त्यातून कोल्हापुरातील उद्योजकांनी या नव्या औद्योगिक उपकरणांचा वापर करून उत्पादन कमी खर्चात दर्जेदार बनविण्याची संधी घ्यावी. उद्योजकांना सवलती मिळाव्यात, यासाठी विधी मंडळात प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी यावेळी दिली. ‘इंडस्ट्रिया’ला त्यांनी आज भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापुरात पहिल्यांदाच इतक्या व्यापक स्वरूपात आयोजित केलेले प्रदर्शन उद्योगविश्वाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.