सातपूर : भारत आणि चीनमधील उद्योजकांनी आपापल्या उद्योग क्षेत्राच्या माहितीचे आदानप्रदान करून गुंतवणूक करावी. उद्योजकांनी चीनला भेट देऊन तेथील उद्योजकांशी चर्चा करावी, असे आवाहन करीत चीनचे कौन्सुलेट जनरल यांन हुआ लॉन्स यांनी ‘हिंदी-चिनी भाईभाई’चा नारा पत्रकार परिषदेत दिला.चीनचे शिष्टमंडळ नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी निमा कार्यालयात येऊन उद्योजकांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना कौन्सुलेट जनरल यान हुआ लॉन्स यांनी चीनमधील उद्योगांची माहिती दिली. दोन्ही देशांतील उद्योजकांनी एकमेकांच्या देशातील उद्योगांचा अभ्यास करावा. चीनमधील उद्योजक भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, तसेच भारतीय उद्योगांनीदेखील चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपापल्या उद्योग क्षमतेची माहिती घ्यावी. भारतीय उद्योगांनी तसेच निमाच्या शिष्टमंडळाने चीनला भेट द्यावी. दोन्ही देशांतील कायदे आणि संस्कृतीची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केले. अॅक्टिंग जनरल कौन्सुल अॅन लिना, चॉन्ग ली यांनी गुंतवणुकीच्या संधीची माहिती दिली. यावेळी सधीद्र कुलकर्णी, अंजली भागवत, रमेश हराळकर, भीष्मराज बाम, निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एन. टी. अहिरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी केले. महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, विवेक गोगटे, रमेश वैश्य, जे. एम. पवार, तसेच हर्षद ब्राह्मणकर, मंगेश पाटणकर, मिलिंद राजपूत, व्हिनस वाणी, आशिष नहार, संदीप भदाणे, प्रकाश ब्राह्मणकर आदिंसह निमा, आयमा सदस्यांशी चीनच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. (वार्ताहर)
भारत-चीनच्या उद्योजकांनी गुंतवणूक वाढवावी
By admin | Updated: September 28, 2015 23:05 IST