करवीरमध्ये प्रस्थापित संचालक बदलाचे संकेत...
By Admin | Updated: January 20, 2015 00:02 IST2015-01-19T21:55:23+5:302015-01-20T00:02:34+5:30
निवडणुकीचे पडघम : गगनबावडा व पन्हाळ्याला संधीची शक्यता; ज्यांच्याकडे ठराव त्याला मिळणार प्राधान्य

करवीरमध्ये प्रस्थापित संचालक बदलाचे संकेत...
प्रकाश पाटील - कोपार्डे= ‘गोकुळ’ दूध संघावर नेहमीच करवीरचा दबदबा आहे. यात मनपा लॉबी तयार झाल्यानंतर काही विशिष्ट व्यक्ती, भाग व नेत्यांच्या नातेवाइकांमध्येच ‘गोकुळ’च्या संचालकपदाची मक्तेदारी राहिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी? असा प्रश्न कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षे ‘गोकुळ’च्या संचालकपदावर असणाऱ्यांना पायउतार करून करवीरमध्ये भाकरी परतणार काय? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
‘गोकुळ’च्या संचालकपदासाठी नेत्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते जरी बनलो, तरी संधी मिळू शकेल ही भावना कार्यकर्त्यांत रुजली आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, तर विधानसभेवेळी पी. एन. पाटील यांच्यासाठी गोकुळच्या संचालकपदासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले होते. तरी निवडणुकीत नेत्यांना मदत केल्याची बेरीज-वजाबाकी मांडून आपण गोकुळसाठी इच्छुकांबरोबर दावेदार असल्याचे गणित बिगुल वाजल्यापासून कार्यकर्ते मांडत आहेत.
करवीरमध्ये असणाऱ्या पाच संचालकांत बाबासाहेब चौगले यांचा पत्ता सतेज पाटलांनी शड्डू ठोकल्याने कट होणार आहे. आनंदराव पाटील (चुयेकर) यांच्या ठिकाणी त्यांचे पुत्र शशिकांत पाटील, विश्वास नारायण पाटील यांच्या जागा निश्चित असून निवास पाटील यांचे पुत्र उत्तम पाटील, की पी. एन. पाटील यांचे पुत्र राजेश पाटील हे लवकरच होणाऱ्या मेळाव्यात ठरणार असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. सुरेश पाटील गेली दहा वर्षे ठाण मांडून असल्याने आता दुसऱ्याला संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे येथे बदलाची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाच संचालकांमध्ये विश्वास पाटील व शशिकांत पाटील (चुयेकर) यांची उमेदवारी निश्चित समजली तरी बाकी तीन जागांवर भाकरी परतणार अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत.
यात एस. के. पाटील (कोपार्डे), प्रकाश पाटील (कोगे), तुकाराम दत्तात्रय पाटील (खुपिरे), बाळासाहेब खाडे (सांगरूळ) यांची नावे आघाडीवर आहेत. यातही संस्थांचे ठराव गोळा करण्यात कोण आघाडीवर आहे, त्यालाच प्राधान्यक्रम दिला जाण्याची मोठी शक्यता आहे.
करवीर मतदारसंघातील पन्हाळ्यामध्ये
अॅड. प्रकाश देसाई यांनी पी. एन. पाटील यांच्या बाजूने राहत नरकेंच्या विरोधात किल्ला लढविला. तेही गोकुळसाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यातच पन्हाळ्यात नरकेंच्या विरोधात एक दमदार गट निर्माण करण्यासाठी अॅड. प्रकाश देसाई यांचे नावही पुढे येण्याची शक्यता आहे.
कार्यकर्ते राजेश यांच्यासाठी आग्रही
पी. एन. पाटील यांनी राजेशला पुढे आणावे यासाठी येत्या चार दिवसांत कार्यकर्तेच मेळावा बोलावणार असल्याचे खात्रिशीर वृत्त आहे. यात पी. एन. पाटील यांच्यावर गोकुळमध्ये राजेशला संधी देऊन आगामी राजकारणासाठी पुढे करावे यासाठी कार्यकर्त्यांतूनच दबाव टाकला जाणार आहे.