त्रिसूत्रीवर भारताचा आर्थिक विकास

By Admin | Updated: August 3, 2014 01:46 IST2014-08-03T01:41:27+5:302014-08-03T01:46:32+5:30

यशवंत थोरात : यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलतर्फे व्याख्यान

India's economic development on Trisutri | त्रिसूत्रीवर भारताचा आर्थिक विकास

त्रिसूत्रीवर भारताचा आर्थिक विकास

कोल्हापूर : आर्थिक स्थैर्य, सर्वसमावेशक वृद्धी आणि सुशासन या त्रिसूत्रीच्या आधारावरच भारताचा सर्वंकष आर्थिक विकास साधता येऊ शकेल, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलतर्फे आज, शनिवारी आयोजित ‘महत्त्वाकांक्षी भारतासाठी आर्थिक कार्यक्रम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
डॉ. थोरात म्हणाले, आर्थिक स्थैर्य हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा मूलभूत पाया आहे. नियंत्रण, चलन मजबुती आणि व्याजदरावर नियंत्रण या तीन बाबींच्या योग्य संतुलनातून आर्थिक स्थैर्य व वृद्धिवाढ होऊ शकते. पुढच्या दहा वर्षांत भारताचा महासत्ता नव्हे, तर किमान मध्यम उत्पन्न गटात समाविष्ट व्हावा, यासाठी आजचा दरडोई वृद्धिदर १६०० डॉलर्सवरून ९००० डॉलर्सवर न्यावा लागणार आहे. यावरून आपल्यासमोरील आव्हानांची कल्पना येईल. त्याचप्रमाणे १९५० पासून आपण सामाजिक न्यायाधिष्ठता व सर्वसमावेशक वृद्धीचा पुरस्कार केला आहे. मूठभरांचे वृद्धीचे धोरण स्वीकारले तर राष्ट्राचे स्थैर्य धोक्यात येईल. त्याचप्रमाणे पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटच्या घटकाचा समावेश या तीन गोष्टींवर आधारित सुशासनाचा अंगीकार केला तरच विकास कार्यक्रमाला योग्य दिशा मिळेल.
डॉ. थोरात पुढे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत भारत आणि भारतीयांच्या एकूणच जीवनप्रणालीला वळण देणाऱ्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला. त्यामध्ये जागतिकीकरणामुळे सरकारकडून बाजाराकडे सरकलेली अर्थव्यवस्थेची सूत्रे, नागरिकांचा सरकारवरील वाढत असलेला प्रभाव, राष्ट्रीय राजधानीकडून राज्यांच्या राजधानीकडे सरकलेला प्रभाव, बिंदूशोषित घटकांमध्ये हक्कांसाठी झालेली जाणीवजागृती, तरुणांची वाढलेली लक्षणीय संख्या, महिला घटकांचा वाढता प्रभाव, शांतिप्रिय भारताला ग्रासलेला दहशतवाद आणि तटस्थ भारताचे बदललेले बहुसहयोगी परराष्ट्र धोरण या आठ घटकांचा मोठा प्रभाव भारताच्या आर्थिक कार्यक्रमावर पडणार आहे.
डॉ. पवार म्हणाले, मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम राबवूनच भारतीय तरुणांना विकासाभिमुख दिशा देण्याची गरज आहे. तरुणाईच्या बळावर देशाला अर्थिक प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत, याबद्दल जबाबदारीने विचार केला पाहिजे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ए. बी. राजगे, डॉ. डी. व्ही. मुळे, यशवंतराव चव्हाण ग्रामीण
विकास स्कूलचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे यांनी स्वागत केले; तर कविता वडाळी यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)

Web Title: India's economic development on Trisutri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.