कोल्हापुरात अवतरली भारतीय संस्कृती...

By Admin | Updated: January 19, 2015 00:20 IST2015-01-18T22:57:19+5:302015-01-19T00:20:08+5:30

जल्लोषात शोभायात्रा : सिद्धगिरी मठावरील संस्कृती उत्सवाला प्रारंभ

Indian culture in Kolhapur ... | कोल्हापुरात अवतरली भारतीय संस्कृती...

कोल्हापुरात अवतरली भारतीय संस्कृती...

कोल्हापूर : विविध वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा दणदणाट, पारंपरिक लोकनृत्यांचे फेर, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचा जयघोष, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ, आदींच्या माध्यमातून अवघी भारतीय संस्कृतीच शहरात आज, रविवारी अवतरली. निमित्त होतं ‘भारतीय संस्कृती उत्सवा’च्या शोभायात्रेचे. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर चौथ्या भारत विकास संगम अंतर्गत आठवडाभर होणाऱ्या भारतीय संस्कृती उत्सवाचा प्रारंभ या शोभायात्रेने झाला. कोल्हापूरसह देशाच्या विविध राज्यांतील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो आबालवृद्ध, भाविक, स्वयंसेवकांचा यातील उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधक ठरला.
येथील गांधी मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून कलाकार, वारकरी, भाविक, आदी दाखल होऊ लागले. तासाभरातच मैदान भाविक, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले. पावणेअकराच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी, गुजरातमधील जुनागढचे मुक्तानंद बापूजी, परमानंद स्वामी सरस्वती, खासदार धनंजय महाडिक, महापौर तृप्ती माळवी, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार शशिकला ज्वोल्ले, अरुंधती महाडिक, रामभाऊ चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते.
डोक्यावर कलश घेतलेल्या १००८ सुवासिनी, सजविलेल्या बैलगाड्या, ढोल-ताशांचा दणदणाट, लेजीमचा ताल, वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगांच्या साथीने सुरू असलेला जयघोष, संत निवृत्तिनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेतील चिमुकले आणि मुक्ताबाई, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याबाबतच्या चित्ररथांतून सामाजिक संदेश देण्यात येत होता. शिवाय लोककलांचे दर्शन घडविणारे वासुदेव, रामलीला, दांडपट्टा, दार्जिलिंगचे पारंपरिक नृत्य, कर्नाटकचे हलगी नृत्य, फुगडी, आदिवासी, कोळीनृत्य अशा विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी शोभायात्रा शहरातील मार्गांवरून निघाली. यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखीसह ग्रामीण जीवनावरील चित्ररथ, शिमोगा येथील खास धनगरी ढोल, मर्दानी खेळ, लोकनृत्य, विविध प्रकारचे वाद्यवृंद, संस्कृती उत्सवाचे फलक घेऊन सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, दानस्वरूपात मिळालेल्या धान्याची वाहने व सण, बलुता पद्धती अशा ग्रामीण जीवनपद्धतीचे दर्शन घडविणाऱ्या १०८ बैलगाड्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)


रामलीला, ओडिसी नृत्य...
बंगलोर येथील कर्नाटक जनपथ अकादमी, के. रामू ग्रुपने ‘रामलीला’ सादर केली. आळते (कोल्हापूर) येथील शिवाजी गुरव आणि विजय गुरव यांनी बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या वेशभूषेत स्वत:ला सादर केले. ओडिसा येथील महिलांच्या पथकाने ओडिसी नृत्य सादर केले.
विजयपूर (मध्य प्रदेश) येथील शाकाहारी संघाचा फळभाज्यांनी सजविलेला टेम्पो लक्ष वेधून घेत होता. हंपी (कर्नाटक) येथील बहुरूपी मंडळाने वादनकला सादर केली.

Web Title: Indian culture in Kolhapur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.