बाजीराव जठार वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी आज, पहाटे संत बाळूमामा मंदिरासमोर भाकणूककार कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक झाली. यात त्यांनी देशासह राज्याच्या राजकारणावर भाकणूक केली. भाकणूक एैकण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
भाकणुकीचा गोषवारा असा भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल. हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करतील, देशात समान नागरी कायदा येणार, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल असे सांगितले.आदमापूर हे गाव दुसरी काशी आहे, बाळू धनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील, माझ्या वाड्याच्या पायऱ्या सोन्याच्या होतील.नदी जोड प्रकल्प येईल. दुष्काळी भागात नंदनवन होईल, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघेल, देशात नवीन कायदा येणार, मोठी महामारी येईल, उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील, नदी जलाशय सगळे आटून जातील, जलप्रलय होईल, जलाशयाला मोठं भगदाडं पडेल, वादळ, भूकंप याने जगाची उलथापालथ होईल, गावातला मनुष्य जंगलात राहील.शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, त्यांचा जयजयकार होईल, हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल.
वाचा - बाळूमामांच्या रथोत्सवाला भक्तांची प्रचंड गर्दी, शेकडो टन भंडाऱ्याची उधळणमहागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, तुम्ही माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा, नीतिमत्तेनं राहशीला तर सुखात राहशीला, आदमापूरच्या लोकांनी एकत्र रहा, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल. वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील.