अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे
By Admin | Updated: May 10, 2016 02:33 IST2016-05-10T01:34:43+5:302016-05-10T02:33:00+5:30
गृहविभागाचा सकारात्मक प्रतिसाद : लवकरात लवकर निर्णय होण्याची भाविकांची मागणी

अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे
गणेश शिंदे --कोल्हापूर --करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली भाविकांची संख्या याचा विचार करून जिल्हा पोलिस प्रशासनाने अंबाबाई देवी मंदिरासाठी पाठविलेल्या स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला असून, नुकतेच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले गृहविभागाचे अप्पर सचिव
के. पी. बक्षी यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलिस ठाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे.
श्री अंबाबाई मंदिर हे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. तसेच शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील रोज दोन वेगवेगळे कर्मचारी दिले जातात; पण येथे सुरक्षेसाठी बहुतांशवेळा मुख्यालयातूनच फौजफाटा आणावा लागतो. महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. विशेषत: सुटीच्या काळात मंदिरात गर्दी होते. काही वर्षांपूर्वी अक्षरधाम मंदिरावरील झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळांची तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गंभीर दखल घेऊन त्यांची सुरक्षितता वाढविली. अंबाबाई देवी मंदिरात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने मंदिराच्या मुख्य दरवाजासह पश्चिम, दक्षिण व उत्तर या चारही दरवाजाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस कर्मचारी दिले. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सुरक्षारक्षक नेमले; पण गेल्या काही वर्षांमध्ये मंदिरात व मंदिर परिसरात होणारी विविध आंदोलने, भाविकांचा वाढलेला ताण यामुळे अंबाबाई देवी मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने तयार केला आहे. पण, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने लवकर मंजूर करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
१०० पोलिस, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा...
सध्या जिल्हा पोलिस प्रशासनाने अंबाबाई देवी मंदिराकरिता ३४ पोलिस कर्मचारी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना आठ-आठ तास अशा तीन वेळेत सेवा बजावावी लागत आहे. मंदिरातील अपुरे मनुष्यबळ याचा विचार करून प्रशासनाने मंदिरासाठी १०० पोलिस कर्मचारी असलेला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवून दिला आहे. मात्र, त्यावर अजून निर्णय झालेला नाही.