संघर्ष समितीच्या जबाबदारीत वाढ
By Admin | Updated: April 4, 2015 00:16 IST2015-04-03T21:10:12+5:302015-04-04T00:16:33+5:30
दौलत साखर कारखाना : राजीनामे खरेखुरे की प्रतीकात्मक

संघर्ष समितीच्या जबाबदारीत वाढ
नंदकुमार ढेरे -चंदगडगेले चार गळीत हंगाम बंद असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरू करण्यात संचालक मंडळाला प्रयत्न करूनही यश न आल्याने त्यांनी आपले राजीनामे नुकतेच दौलत बचाव संघर्ष समितीकडे सुपूर्द केले. संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर संचालक मंडळाला राजीनामे द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर दौलत सुरू करण्याची जबाबदारी संघर्ष समितीवर असेल, तर दुसरीकडे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या व्यतिरिक्त अन्य संचालकांनी आपले राजानामे साध्या कागदावर दिले असल्याने ते खरेखुरे की प्रतीकात्मक आहेत याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून दौलत सुरू करण्याच्या दृष्टीने संघर्ष समितीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, संचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कारखाना चालविण्यास कोणतीच पार्टी इच्छुक नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने ठरावीक मुदतीत कारखाना सुरू करावा, अन्यथा राजीनामे देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी समितीच्यावतीने लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांना हलकर्णी फाट्यावर अडवून राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळीही गोपाळराव पाटील यांनी ठरावीक मुदतीत आपण कारखाना सुरू न करू शकल्यास सर्व संचालकांचे राजीनामे दऊ, असे सांगून वेळ मारून नेली होती.त्यावेळी गोपाळराव पाटील यांनी आपला राजीनामा साध्या कागदावर लिहून दऊन वेळ मारून नेली होती. नुकतेच ‘दौलत’च्या संचालकांनी राजीनामे दिले असले तरी केवळ अध्यक्ष अशोक जाधव यांचा राजीनामा लेटरहेडवर आहे. तर अन्य संचालकांनी आपले राजीनामे साध्या कागदावर दिले आहेत. ‘दौलत’ची नोंदणी बहुराज्य कायद्याखाली असल्याने साध्या कागदावरील राजीनामे केंद्रीय सहकार निबंधक ते ग्राह्य मानणार का ? संचालकांनी दिलेले राजीनामे हे ऐनवेळी दिलेले नाहीत. त्यामुळे राजीनामे देताना संचालकांजवळ लेटरहेड नव्हते, असे म्हणण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे साध्या कागदावर देण्यामागील हेतू काय? काही असले तरी ज्या पोटतिडकीने संघर्ष समितीने संचालकांचे राजीनामे घेतले. त्याच पोटतिडकीने आता संघर्ष समितीला ठोस पावले उचवावी लागतील.
जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची
थिटे पेपर्सचा दावा न्यायालयाने फेटाळल्याने एक अडथळा दूर झाला आहे. मात्र, आता बँक कारखान्याची निर्विवाद ताबेदार झाल्याने ‘दौलत’चे काय करायचे याचा निर्णय बँकच घेणार आहे. दौलत सुरू करण्यासंदर्भात बँक, सभासद, शेतकरी व कामगार यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे दौलत बचाव संघर्ष समितीचे नेते डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले.
दौलत कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्याचबरोबर कारखाना चालवायला देण्यासंदर्भात येत्या चार दिवसांत वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केली जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू व्हावा हीच आमचीही इच्छा असल्याचे जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.