जिल्ह्यात हिमोफिलिया रुग्णांची संख्या वाढतेय
By Admin | Updated: August 7, 2014 00:20 IST2014-08-06T23:29:39+5:302014-08-07T00:20:47+5:30
औषध पुरवठ्याची मागणी : इतर जिल्ह्यात मोफत सोय

जिल्ह्यात हिमोफिलिया रुग्णांची संख्या वाढतेय
सांगली : जिल्ह्यात हिमोफिलिया आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांना मोफत औषधोपचाराची सांगली जिल्ह्यात सोय करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सांगली जिल्ह्यातील रुग्णांना औषधासाठी इतर जिल्ह्यात जावे लागत आहे.
सांगली जिल्ह्यात सुमारे शंभराच्या घरात हिमोफिलिया आजाराने रुग्ण त्रस्त आहेत. यावर कोणत्याही स्वरुपात कायमस्वरुपी उपचार नाही. या रुग्णांचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी सुमारे ४५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. राज्यातील शासकीय रुग्णालयांत यावर मोफत उपचार केले जातात; मात्र सांगली जिल्ह्यात तशी सोय नाही. असे रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्यास त्यांना सातारा येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात येते.
कफावाटे रक्त पडणे, वाहणे म्हणजे हिमोफिलिया. रक्त न थांबता नाकातून, तोंडातून, लघवीतून, योनीतून, काळे रक्त पोटातून येते. तांबडे रक्त फुप्फुसातून येते. मूळव्याध नसतानाही शौचाच्यावेळी रक्त पडणे, शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास अशा रुग्णांना रक्त घ्यावे लागते. विशेषत: विदर्भामध्ये याचे रुग्ण आढळतात. आता सांगली जिल्ह्यातही असे रुग्ण आढळू लागले आहेत. यासाठी लागणारे इंजेक्शन बाजारात मिळत नाही, ते परदेशातून मागवावे लागते. यासाठी रुग्णाने शासकीय रुग्णालयात अर्ज करून याची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर संबंधित रुग्णाला औषध पुरवठा सुरू होतो. सांगली जिल्ह्यातही अशा रुग्णांना औषध पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या रुग्णांनी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात अशा रुग्णांसाठी जिल्हा नियोजन समितीमध्येच निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशी तरतूद सांगली जिल्ह्यातही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
हिमोफिलियाचे रुग्ण आपल्या जिल्ह्यात नाहीत. एखाद्-दुसरा रुग्ण आल्यास आम्ही त्याला तपासणीसाठी सातारा येथे पाठवतो. त्याठिकाणी तज्ज्ञांमार्फत तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात. असे रुग्ण असल्यास त्यांनी जिल्हा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी रुग्णाने अर्ज करायला हवा. त्यानंतर त्याच्यावर मोफत औषधोपचार केले जातात.
- डॉ. राम हंकारे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली.