शाहूंच्या जिल्ह्यातही महिला अत्याचारात वाढ
By Admin | Updated: August 1, 2014 00:38 IST2014-07-31T23:42:29+5:302014-08-01T00:38:20+5:30
वर्षा देशपांडे : बलात्काराचे ४८, विनयभंगाचे ६६ गुन्हे अद्याप प्रलंबित

शाहूंच्या जिल्ह्यातही महिला अत्याचारात वाढ
गडहिंग्लज : पुरोगामी लोकराज्यात शाहूंच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. एका वर्षातच बलात्काराच्या ४८, तर बलात्काराच्या गुन्ह्यात परिवर्तित होऊ शकणारे विनयभंगाचे ६६ गुन्हे प्रलंबित आहेत ही गंभीर बाब आहे, अशी माहिती राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बसर्गे येथील प्रकरणाच्या निमित्ताने त्या गडहिंग्लजला आल्या होत्या. यावेळी २०१२-१३ या केवळ एका वर्षातील महिलांवरील प्रलंबित अत्याचारांचा पाढाच त्यांनी वाचला.
देशपांडे म्हणाल्या, गतवर्षी जिल्ह्यात हुंड्यासाठी खुनाचे ३, हुंडाबळीच्या १७, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल २५, अपहरणाबद्दल २२, तर पती व सासरच्या छळप्रकरणी तब्बल १४८ गुन्ह्यांची नोंद झाली. नोकरीच्या ठिकाणी अत्याचाराच्या ३२, अवैध व्यवसायास प्रवृत्त केल्याबद्दल ३, तर अश्लीलता प्रदर्शनाबद्दल २ गुन्हे जिल्ह्यात दाखल आहेत. बीड, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारात कोल्हापूरचा चौथा क्रमांक लागतो.
मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेतदेखील ही आकडेवारी चिंताजनक आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात स्त्री-भृ्रणहत्या रोखण्यासाठी सायलेंट आॅब्जर्व्हचा प्रयोग झाला. मात्र, मुलींच्या संख्येत अपेक्षित वाढ न झाल्यामुळे हा प्रयोगही अयशस्वी ठरला, त्यामुळे जिल्ह्यात या व्हाईट कॉलर क्राईममध्ये वाढ झाली आहे.
महिलांवरील अत्याचारांबाबतही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तमिळनाडूमध्ये छेडछाड देखील दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. मात्र, पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात हाच गुन्हा अदखलपात्र आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात देखील पोलीसच आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांना आरोपी सापडत नाहीत.
महिलांची अब्रू ही काही राजकारणासाठी वापरली जाणारी बाब नाही. मात्र, आर. आर. पाटील यांच्यासारख्या संवेदनशील गृहमंत्र्यांच्या कारकिर्दीत मुंबईच्या शक्ती मिलमध्ये मीडियातील तरुणीवर झालेल्या बलात्काराचेदेखील मार्केटिंग करून राजकारणासाठी वापर झाला. ही लाजिरवाणी बाब आहे. यापुढे हे चालू देणार नाही, असा इशारा अॅड. देशपांडे यांनी दिला. यावेळी प्रा. स्वाती कोरी व कॉ. उज्ज्वला दळवी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)