‘आशां’च्या मोबदल्यात होणार वाढ

By Admin | Updated: July 5, 2014 00:06 IST2014-07-04T22:57:00+5:302014-07-05T00:06:35+5:30

वर्कर्स युनियनचे स्पष्टीकरण; सीटूच्या आंदोलनाला यश

Increase in the price of 'Asha' will increase | ‘आशां’च्या मोबदल्यात होणार वाढ

‘आशां’च्या मोबदल्यात होणार वाढ




कणकवली : महाराष्ट्रातील सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनांमुळे ‘आशां’च्या मोबदल्यात दुप्पट वाढ होणार आहे, असे सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनने म्हटले आहे.
मंगळवारपासून मुंबईत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यातील २३३१ आशासेविका सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देत होत्या. या आंदोलनाची दखल घेत आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळास मंत्रालयात निमंत्रित केले. त्यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन शेट्टी यांना दिले. तसेच सीटूच्या नेत्यांनी ४ व ५ जून रोजी आरोग्यमंत्र्यांची मंत्रालयात भेटून दिलेल्या मागण्यांचे व त्यावर त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी सुरेश शेट्टी यांनी आशांना सध्या जे लाभ मिळतात.
महिन्याला मोबदल्याची जेवढी रक्कम मिळते तेवढीच जादा रक्कम राज्य सरकार घालेल व दुप्पट मोबदला आशांना दिला जाईल, असा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. जननी सुरक्षा योजनेतील दारिद्रय रेषेखालील व रेषेवरील असा भेदभाव न करता सर्वांनाच लाभ दिला जाणार आहे.
मासिक बैठक भत्ता दुप्पट म्हणजे ३०० रूपये केला जाईल, कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक आशा वर्कर यांना मासिक किमान १ हजार रूपयांपेक्षा कमी मोबदला मिळणार नाही याची हमी दिली जाईल व आशांनी कोणतेही काम विनामोबदला करू नये, असे परिपत्रक लवकरच काढले जाईल, असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात शुभा शमीम, विजय गाभणे, नेत्रदीपा पाटील, कल्याण मराठे आदी सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी सीटू संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक समन्वय समितीने १५ जुलैपर्यंत या आश्वासनांची शासनाने पूर्तता न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्णय घेतला.
या आंदोलनात सीटूचे राज्य नेते मरियम ढवळे, आरमायटी इराणी, डॉ.सुभाष जाधव, माणिक अवघडे, सोनिया गिल, कल्पनाताई शिंदे, सुभाष निकम, विजयाराणी पाटील यांनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्गातून अर्चना धुरी, सुनिता पवार, ज्योती सावंत, विशाखा पाटील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या
होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in the price of 'Asha' will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.