करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील महिलेवर अत्याचार तसेच जादूटोणा करणाऱ्या सिरसंगी (ता. आजरा) येथील संशयित बाळू दळवी याला १८ डिसेंबरअखेर पोलीस कोठडी मिळाली.
शनिवारी (दि. १२) दळवीसह अन्य तिघांवर जादूटोणा व फसवणुकीचा गुन्हा नेसरी पोलिसांत नोंद झाला होता. त्याच दिवशी त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्याची मुदत संपत असल्याने दळवी याला पुन्हा गडहिंग्लज उपजिल्हा न्यायालयात हजर केले असता आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे. यामुळे पोलीस खात्याला मूळ तपासाच्या दृष्टीने पाऊल टाकणे सोयीचे झाले आहे. गेले दोन दिवस या कामात तपास अधिकारी म्हणून काम पाहणारे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व तसेच नेसरीचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी तपासाची चक्रे वाढवली असून भोंदू बाळू दळवीच्या कारनाम्याचे आणखी काही धागेदोरे मिळतात का या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. गेले तीन दिवस साक्षीदारांची माहिती तसेच त्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे, तर यातील सिरसंगी गावचाच दळवी याचा दुसरा साथीदार संशयित लक्ष्मण सुतार याच्याही शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे. गेले दोन दिवस तो पोलिसांना हुलकावणी देत आहे. तसेच जादूटोणामध्ये सामील असणाऱ्या सावंतवाडी येथील दोन आरोपींची नावे अजून निष्पन्न झाली नसल्याने त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.