टोलनाक्यावर दोन महिन्यांत लेनची संख्या वाढवा
By Admin | Updated: April 8, 2015 00:32 IST2015-04-07T23:33:02+5:302015-04-08T00:32:03+5:30
आनेवाडी : व्यवस्थापनाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश

टोलनाक्यावर दोन महिन्यांत लेनची संख्या वाढवा
सातारा : आनेवाडी येथील टोल नाक्यावर होणारी कोंडी लक्षात घेऊन दोन महिन्यांत दोन स्वतंत्र शुल्क संकलन केंद्रे येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावर वेगवेगळ्या स्वरूपात उभारावीत आणि प्रत्येक ठिकाणी लेनची संख्या ८ ते १० असावी, असा आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाला दिला आहे. पी. एस. टोल प्रा. लि. या कंपनीला आनेवाडी टोल नाक्यावर शुल्कसंकलनाचा ठेका देण्यात आला आहे. तेथे होणाऱ्या अनुचित प्रकारांबद्दल जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १३३ (अ) अन्वये कारवाई करून अहवाल मागविला होता. खुलासा सादर करण्यासाठी कंपनीला ३० मार्चची मुदत देण्यात आली होती. त्या दिवशी टोल व्यवस्थापक विवेक शर्मा यांनी खुलासा सादर केला होता. करारनामा, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, गैरवर्तणूक करणाऱ्यांवरील कारवाई, २० किलोमीटर परिघातील वाहनांना सवलतीचे पास, लेनची सध्याची संख्या, फेरीवाल्यांचा वावर आदी विषयांवर कंपनीने सादर केलेल्या खुलाशानंतर हे आदेश देण्यात आले.आनेवाडी नाक्याबाबत सातत्याने तक्रारी होत असून, वाहनांच्या लांब रांगा लागतात. त्यामुळे लेनची संख्या वाढविणे आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन ठेवणे आवश्यक आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी आदेशात म्हटले आहे.
रुग्णवाहिकांबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठीही स्वतंत्र लेन तयार करण्यास सांगण्यात आले असून, लेनमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाहने रांगेत असतील तर त्या ठिकाणी जादा कर्मचारी नेमून तातडीने लेनमधील वाहतूक सुरळीत करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
असे आहेत अन्य आदेश
शुल्कसंग्रह करण्यासाठी प्रशिक्षित आणि नम्र कर्मचारी नेमावेत.
कर्मचारी आणि वाहनचालकांत तंटा होऊ देऊ नये.
शुल्क संकलनाच्या ठिकाणी कंपनीचा जबाबदार अधिकारी कायमस्वरूपी असावा.
टोल नाक्यावरील फिरत्या विक्रेत्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
तक्रार पेटी व तक्रार नोदविण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याचा दूरध्वनी क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावा.