प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील भोगावती नदीवरील बालिंगा पुलाला होणाऱ्या समांतर पुलाची लांबी तब्बल २० मीटरने वाढली असून, तो आता १२३ मीटरचा होणार आहे. पाच गाळ्यांचे पूल होणार असून, वाढीव लांबीची मंजुरी गरजेची आहे. वाढीव कामाची मंजुरी मिळाल्याशिवाय कामाला गती येणार नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तरी पुलाचे काम होणार का? हे पाहावे लागणार आहे.भोगावती नदीवरील बालिंगा येथील १३८ वर्षांचा ब्रिटिशकालीन जुना पूल कुमकुवत झाल्याने समांतर नवीन मोठे पूलही होणार आहे. या पुलाचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे. पावसाळ्यात जुन्या पुलावरील वाहतूक महापुरात बंद होते. पावसाळा संपून दोन महिने झाले तरी कामाला गती मिळालेली नाही. पुलाच्या मंजूर स्ट्रक्चर डिझाइनमध्ये बदल होऊन पुलाची लांबी वाढली आहे. वाढीव कामाला मंजुरी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा होणार पूलपुलाला एकूण पाच गाळे असणार आहेत. यात मध्यभागी असणारे दोन गाळे ४२ मीटरचे, २१ मीटरचा एक व पूर्वेला व पश्चिमेला ९ मीटरचे दोन गाळे, असे १२३ मीटर लांब व १६ मीटर रुंदीचा पुलावर स्लॅब असणार आहे.
कोल्हापूर ते कळे मार्ग असा होणार
- अंतर - १६.४०० किलोमीटर
- बजेट - १६८ कोटी
- रस्त्याची रुंदी - १० मीटर
- पुलांची संख्या - बालिंगा येथे मोठा पूल, दोन लहान पूल व १२ ठिकाणी पाइप कल्व्हेटर, ८ ठिकाणी लहान मोऱ्या.