हरकतींसाठी मुदत वाढवा

By Admin | Updated: September 25, 2015 00:24 IST2015-09-25T00:21:39+5:302015-09-25T00:24:07+5:30

मतदार यादी घोळ : राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्याचा महापालिका सभेत निर्णय

Increase deadline for objections | हरकतींसाठी मुदत वाढवा

हरकतींसाठी मुदत वाढवा

कोल्हापूर : मनपा निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांत अतिशय गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असल्याने तसेच अनेक मतदारांची नावे नजीकच्या कोणत्या प्रभागात गेली आहेत याचा थांगपत्ता लागत नसल्याने प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी एकमुखी मागणी गुरुवारी झालेल्या महानगरपालिका सभेत करण्यात आली. यासंबंधीचा ठराव राज्य निवडणूक आयोगाकडे तातडीने पाठविण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या.
शहरातील ८१ प्रभागांतील प्रारूप मतदार याद्यांबाबत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत. त्याचे पडसाद गुरुवारी महानगरपालिका सभेतही उमटले. मोहन गोंजारे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करून चर्चेला तोंड फोडले. आपण ज्या प्रभागात राहतो त्यासह आसपासच्या तीन प्रभागांतील याद्यात माझे नाव शोधले पण सापडले नाही, आता आणखी किती याद्या बघायच्या, असा संतप्त सवाल गोंजारे यांनी उपस्थित केला. महेश सावंत यांनीही यादीतील घोळ कसा झाला, याचे विवेचन केले.
कसबा बावड्यातील आपल्या प्रभागात ५०० मतदारांची नावेच गायब झाल्याची तक्र ार प्रदीप उलपे यांनी केली. लीला धुमाळ यांनी त्यांच्या प्रभागात मृत झालेल्या २०० व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत, बदली होऊन गेलेल्या मतदारांची नावे आहेत, परंतु सध्या तेथे राहणाऱ्या असंख्य व्यक्तीची नावेच गहाळ झाल्याचे सांगितले.
मनपाच्या या भोंगळ कारभाराने ३० ते ४० हजार मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती प्रा. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. चर्चेअंती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्या मागे घ्याव्यात आणि नव्याने प्रसिद्ध कराव्यात, हरकती घेण्यासाठीची मुदत २८ सप्टेंबरपर्यंत आहे, ती वाढवून द्यावी, अशा मागणीचा ठराव सभेत करण्यात आला. हा ठराव आजच्या आजच फॅक्सद्वारे किंवा ई-मेल करून आयोगाकडे पाठविण्याचा निर्णय झाला.

निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी
मतदार याद्यांत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी योग्य संधी मिळाली पाहिजे, मतदारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी राज्य सरकारने महानगरपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी, अशी मागणी मोहन गोंजारे, जहाँगीर पंडत, निशिकांत मेथे यांनी केली. विशेष म्हणजे तिघांच्या प्रभागावर आरक्षण राहिल्याने त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे या मागणीकडे कोणी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही.


प्रशासनासही करणार विनंती : आयुक्त
मतदार याद्यांतील चुकांचे प्रमाण जादा आहे. त्यावर हरकती मोठ्या प्रमाणात येत आहे. आजपासून तीन दिवस पुन्हा सुटी असल्याने हरकती घेण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती राज्य आयोगाकडे प्रशासनातर्फे केली जाईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Web Title: Increase deadline for objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.