शेतीच्या मशागतीमध्ये एकरी एक हजाराने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:55+5:302021-02-08T04:21:55+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने त्याची झळ सर्वसामान्यांना बसली ...

शेतीच्या मशागतीमध्ये एकरी एक हजाराने वाढ
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने त्याची झळ सर्वसामान्यांना बसली आहे. शेतीच्या मशागतीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एकरी एक हजार रुपयांनी मशागत महागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. अगोदरच खतांचे दर गगनाला भिडले असताना आता मशागतही महागल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
पूर्वी शेतीची मशागत बैलांच्या माध्यमातून केली जायची. मात्र अलीकडील दहा-बारा वर्षात शासनानेच शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. अनुदानावर लहान ट्रॅक्टर दिल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यातील बैल जाऊन त्याठिकाणी छोटे-छोटे ट्रॅक्टर आले आहेत. त्यात शेतीला जोडधंदा म्हणून पुढे आलेला दूध व्यवसाय आता प्रमुख व्यवसाय झाला आहे. त्यामुळेही दुभत्या जनावरांचे संगोपन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची सगळी जबाबदारी पॉवर टिलरसह मोठ्या ट्रॅक्टरवर आली आहे.
बैलांपेक्षा चार पैसे जादा गेले तरी मशागत चांगली होत असल्याने शेतकरीही यांत्रिकीकरणाकडे वळले. डिझेलच्या दरावर मशागतीचे दर अवलंबून असल्याने त्यानुसार दरात थोडी थोडी वाढ होत गेली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून डिझेलच्या दरात भरमसाट वाढ होत आहे. ऐंशी रुपये ओलांडले तरी रोज दरात वाढ होतच चालली आहे. त्याचा थेट परिणाम मशागतीच्या दरावर झाला आहे.
मनमानी दरातून शेतकऱ्यांची लूट
ट्रॅक्टरचालकही मनमानी दर लावून शेतकऱ्यांची लूट करत असल्याच्या तक्रारीही आहेत. काही तालुक्यात एकरी २५०० रुपये दर आहे, तर काही ठिकाणी ३५०० रुपयांनी नांगरट केली जाते.
पाॅवर टिलरकडे वाढता कल
बैलांनी अथवा मोठ्या ट्रॅक्टरने मशागत केल्यानंतर जमीन लवकर हाताखाली येत नाही. एका दिवसात जमीन तयार होत असल्याने छोट्या पाॅवर टिलरने मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
मशागतीचे दर, एकरी असे-
मशागतीचा प्रकार साल २०२० साल २०२१
नांगरट (रोटर) २६०० ३६००
सरी सोडणे २४०० ३६००
फोडून भरणी करणे ४२०० ५२००
भाताचा चिखल ६००० ६५००
कोट-
डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात लिटरमागे २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यात ट्रॅक्टरची झीज व दुरुस्ती पाहता, हा व्यवसाय परवडत नाही.
- सतिश पानारे (ट्रॅक्टरचालक)
केंद्र सरकारने हळूहळू खताच्या अनुदानातून अंग काढून घेतल्याने शेती आतबट्टयात आली आहे. आता मशागतीच्या दरवाढीने, पिके घ्यायची कशी? असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
- मारुती लोंढे (शेतकरी, सांगरूळ)