अनुसूचित जमातीत समावेश करा
By Admin | Updated: August 1, 2014 23:23 IST2014-08-01T22:31:11+5:302014-08-01T23:23:59+5:30
धनगर समाजाची मागणी : इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा

अनुसूचित जमातीत समावेश करा
इचलकरंजी : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी येथील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने प्रांत कार्यालयावर आज, शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजातील एका संघटनेच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना जिल्हा बंदी करणार, अशी घोषणा मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी भाषणात केली.
धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने आज येथील घोरपडे नाट्यगृह चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बकरी, ढोल, ओवी नृत्य अशा पारंपरिक गोष्टींचा समावेश करून मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा मुख्य मार्गावरून फिरून प्रांत कार्यालय चौकात आला. चौकात घोषणा देत काही वेळ रास्ता रोकोही करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोर्चाला रस्ता रिकामा करून प्रांत कार्यालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सभेमध्ये मलकारी लवटे, संजय खोत, विठ्ठल चोपडे, नागेश पुजारी, कल्लाप्पा गावडे, अशोक आरगे, आदींची भाषणे झाली. यावेळी धनगर समाजाच्या २१ व्या शतकातील जीवनपद्धती, परंपरागत चालत आलेला व्यवसाय, याबाबत भाषणे करण्यात आली. तसेच सरकार आरक्षणाबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत निषेधही नोंदविण्यात आला.
चोपडे यांनी १५ आॅगस्टपर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील कॉँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याची घोषणा केली. यावेळी शंकरराव पुजारी, कोंडिबा बंडगर, विठ्ठल सुर्वे, दीपक सुर्वे, दत्तात्रय कुंभोजे, जीवन बरगे, रणजित जाधव, किशन पुजारी, संदीप कारंडे, आदींसह धनगर समाजातील बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)