आजऱ्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७५.१७ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:24+5:302021-06-03T04:18:24+5:30
सदाशिव मोरे लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : तालुक्यात पहिल्या लाटेत १९ तर दुसऱ्या लाटेत ११ गावांमध्ये कोरोनाचा अद्यापही शिरकाव ...

आजऱ्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७५.१७ टक्के
सदाशिव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : तालुक्यात पहिल्या लाटेत १९ तर दुसऱ्या लाटेत ११ गावांमध्ये कोरोनाचा अद्यापही शिरकाव झालेला नाही. तालुक्यात ४०पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण असणारी ९ गावे आहेत. गत दोन महिन्यात ९६ महसुली गावांपैकी ३० गावांमधील ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन महिन्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७५.१७ टक्के इतके आहे. आजरा, उत्तूर, भादवण या गावांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची भीती अधिक आहे.
आजरा तालुक्यात गेल्यावर्षी हारूर गावापासून सुरू झालेला कोरोना अद्यापही थांबलेला नाही. सध्या वाढलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व मृत्यूंचे वाढलेले प्रमाण पाहता, सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. ग्रामसुरक्षा समिती व शासनातर्फे केले जाणारे विविध प्रयत्न यांना नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच आहे.
तालुक्यातील आजरा, उत्तूर, भादवण, मडिलगे, पेरणोली, कानोली, चव्हाणवाडी, वडकशिवाले, महागोंड या गावांमध्ये दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे.
तालुक्यात सध्या ४ ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात. सर्वच ठिकाणी ऑक्सिजनची सोय आहे, पण व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे रुग्णांना गडहिंग्लज, कोल्हापूर, बेळगाव याठिकाणी जावे लागत आहे. त्यातच या शहरांमधील हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणारे अनेक रुग्ण गावातच फिरत राहिल्याने व शेवटच्या टप्प्यात कोविड सेंटरला दाखल होत असल्याने मृत्यूंचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे.
-----------------------
*
एप्रिलपासून कोरोनाची स्थिती
- कोरोनामुक्त प्रमाण - ७५.१७ टक्के.
- मृत्यूचे प्रमाण - ३.४० टक्के.
- पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण - ३०.१६ टक्के.
- सक्रिय रुग्णांचे प्रमाण - २१.४१ टक्के.
- एकूण स्वॅब घेतले - ५६०६. - प्राप्त अहवाल - ५४०२. - अप्राप्त अहवाल - २०४. - पॉझिटिव्ह रुग्ण - १६७२. - उपचारानंतर घरी सोडले - ५९१.
- निगेटिव्ह रुग्णसंख्या - ३७३०. - दोन महिन्यात मृत्यू - ५७. --------------------------
*
कोरोनाचा शिरकाव न झालेली गावे
हाजगोळी खुर्द, बोलकेवाडी, सावरवाडी, भावेवाडी, पारेवाडी, पेठेवाडी, देवकांडगाव, मेढेवाडी, देऊळवाडी, सातेवाडी, आल्याचीवाडी. -------------------------
*
४०पेक्षा जास्त रुग्ण असणारी गावे
आजरा, उत्तूर, भादवण, मडिलगे, पेरणोली, कानोली, चव्हाणवाडी, वडकशिवाले, महागोंड.