जयहिंद दूधसंस्था नूतन वास्तूचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:15+5:302021-01-04T04:21:15+5:30
कसबा तारळे : गावागावातील गट-तट, मतभेद हे गावाच्या वेशीबाहेर ठेवून प्रत्येकाने सामंजस्याची भूमिका घेतल्यास गावाचा सर्वांगिण विकास साधता येईल, ...

जयहिंद दूधसंस्था नूतन वास्तूचे उद्घाटन
कसबा तारळे : गावागावातील गट-तट, मतभेद हे गावाच्या वेशीबाहेर ठेवून प्रत्येकाने सामंजस्याची भूमिका घेतल्यास गावाचा सर्वांगिण विकास साधता येईल, असे मत आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथील जयहिंद दूध संस्थेच्या नवीन वास्तू उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील तर गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रारंभी अशोक पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रास्ताविकात जिल्हा शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी दूध संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तर वजनकाट्याचे पूजन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दूध संकलन कक्षाचे उद्घाटन ए. वाय. पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवोदित साहित्यिक प्रा. चंद्रशेखर कांबळे, विशाल भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक डोंगळे म्हणाले, शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातूनही या व्यवसायाकडे पाहण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी भविष्यातील सर्वच निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील, असे सांगितले.
कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सभापती वालूबाई पाटील, दीपक पाटील, संग्राम पाटील, नेताजी चौगुले, संस्थेचे अध्यक्ष विलास गुरव, उपाध्यक्ष पांडुरंग कांबळे, अपर्णा पाटील, धनाजी सरावणे, बाबुराव भोसले, संग्राम पाटील, जयसिंग पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते. सचिव नेताजी शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले.