कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मूळचे राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील श्रीरंग बरगे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापुरी हिसका दाखवला. बैठकीतच सदावर्ते बरगे यांना ‘टकल्या’ म्हणाले. बरगे यांनी सदावर्ते यांना ‘हेकन्या’ म्हटल्याने वाद उफाळला. बरगे हे सदावर्ते यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंंत्री फडणवीस यांनी दोघांना सावरले. मी पैलवानांच्या गावातून आलो आहे. सदावर्ते यांना बैठकीतच हिसका दाखवला. मीच त्यांच्या अंगावर धावून गेलो, असे बरगे यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर गुरुवारी जोरदार व्हायरल झाला.बरगे म्हणाले, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून ४३ वर्षांपासून कार्यरत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागणीवर बैठक सुरू होती. बैठकीत सदावर्ते नेहमीप्रमाणे प्रसिद्धीसाठी विषय सोडून बोलत होते. त्यामुळे मला हसू आले. हसण्यावर आक्षेप घेत सदावर्ते माझ्या दिशेने येताच मीच त्यांच्या अंगावर धावून गेलो. मी पैलवानाच्या गावातून आलो आहे. कुस्ती खेळलो आहे. माझ्या अंगावर कोण धावून येतो? मीच सदावर्ते यांच्या अंगावर धावून गेलो. प्रसिद्धीसाठी सदावर्ते नेहमी ज्येष्ठ नेत्यांना काहीही बोलत असतात. एसटी कर्मचारी आंदोलनातही प्रसिद्धीसाठी त्यांनी घुसखोरी केली. म्हणून मी त्यांना बाप भेटलो. कोल्हापुरी पाणी काय असते, ते दाखवून दिले. बरगे यांना अपमानास्पद बोलल्याबद्दल सदावर्ते यांचा अमरावतीसह राज्यातील विविध आगारांतील कर्मचाऱ्यांनी निषेध केला.
एसटी कर्मचारी बैठकीत सदावर्तेंना कोल्हापुरी हिसका, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:34 IST