कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी आज, सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना भर उन्हात प्रचंड त्रास सहन करावा लागला.दरम्यानच, कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख ७० हजारांनी विजयी झालो झालो होतो, असे सांगत कदाचित मी हे लीड ओलांडून विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. तर हातकणंगले मतदार संघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी, वंचितचे डी.सी. पाटील यांच्यात लढत होणार आहे.शनिवारी (दि.१३) पहिल्या दिवशी हातकणंगलेमधून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे दादासाहेब चवगोंडा ऊर्फ डी. सी. पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. कोल्हापुरातून २७ जणांनी ७० उमेदवारी अर्ज तर हातकणंगलेमधून ३६ जणांनी ६७ उमेदवारी अर्ज नेले होते.
कोल्हापुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंडलिक, मानेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:59 IST