सुधारित : क्षीरसागर यांच्या विकासकामांना कोविड प्रतिबंधाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:50+5:302021-05-05T04:38:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास पोलीस ...

सुधारित : क्षीरसागर यांच्या विकासकामांना कोविड प्रतिबंधाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास पोलीस प्रशासनाने लावलेल्या कोविड नियमांचा फटका बसला आहे. पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात विकास कामांचा प्रारंभ केल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अभिषेक विजय देवणे (रा. देवणे गल्ली, मंगळवार पेठ), जयवंत अशोकराव हारुगले, गजानन भुर्के (रा. दोघेही मंगळवार पेठ) या तिघा संशयितांचा समावेश आहे. गोकूळ निवडणुकीपासून अन्य अनेक कार्यक्रम गर्दीत सुरू असताना नेमक्या याच कार्यक्रमाला नियम लावल्याने हा विषय वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित आदेश जारी केला असताना तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत हा कार्यक्रम केल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे. मूलभूत सुविधांकरिता मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांनी शहर विकासासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात दि. २८ एप्रिलला विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधित आदेश जारी केले आहेत. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत, कोणतीही पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता कार्यक्रम घेतला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंधक, महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना या नियमांचा भंग केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.