‘आयजीएम’चे आरोग्य सुधारणार

By Admin | Updated: November 25, 2014 21:52 IST2014-11-25T21:52:48+5:302014-11-25T21:52:48+5:30

आयसीयुबरोबर ट्रामा केअर सेंटर : ३५० खाटांच्या आधुनिक हॉस्पिटलसाठी ३१ कोटींचा प्रस्ताव

Improve the health of IGM | ‘आयजीएम’चे आरोग्य सुधारणार

‘आयजीएम’चे आरोग्य सुधारणार

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील नगरपालिकेच्या आयजीएम दवाखान्याला नवसंजीवनी देण्याबरोबरच अतिदक्षता विभाग, अपघातग्रस्तांवर शस्त्रक्रिया व उपचार असे ३५० खाटांचे आधुनिक हॉस्पिटल करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. साधारणत: ३१ कोटी रुपये खर्चाच्या योजनेसाठी केंद्राच्या नागरी आरोग्य अभियानातून निधी आणण्याचा निर्धार आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला आहे.
नगरपालिकेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून, पालिकेकडे केईएम हॉस्पिटल हे हॉस्पिटल होते. नगरपालिकेने ३५० खाटांची क्षमता असलेले नवीन इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल बांधल्यानंतर केईएममधील ७५ खाटांचा दवाखाना हलविला. सध्याच्या गोकुळ चौकातील आयजीएम हॉस्पिटलच्या इमारतीत सध्या १७५ खाटांचा दवाखाना गेली अठरा वर्षे सुरू आहे. पालिकेकडे जकात सुरू असताना दवाखान्याचा खर्च पालिकेला पेलावत होता. जकात बंद झाली आणि शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदानावर पालिकांचा खर्च सुरू आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन देण्यात आले. त्यामुळे अतिरिक्त बोजा पडलेल्या पालिकेला सातत्याने नुकसानीत असलेल्या आयजीएम दवाखान्याचा खर्च पेलवत नसल्याने ‘आयजीएम’ च आजारी आहे. नागरिकांना आरोग्याची जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी आयजीएमला केंद्र सरकारच्या नागरी आरोग्य अभियानातून किंवा तत्सम योजनांतून निधी आणून दवाखान्याला नवसंजीवनी देण्याचा विडा आमदार हाळवणकर यांनी उचलला आहे.
आयजीएमकडे सध्या १७५ खाटांचा दवाखाना सुरू आहे. त्यामध्ये आता ३५० खाट सुरू करण्यासाठी विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दवाखान्याकडे सध्या देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा व उपक्रमांबरोबरच नवीन अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार असून, अपघातग्रस्तांसाठी शस्त्रक्रिया व उपचार करण्याचे केंद्रसुद्धा नव्याने उभारणार आहे. अतिदक्षता विभागाकडील विविध उपकरणे व यंत्रसामग्रीला एक कोटी ४३ लाख रुपये खर्च येणार आहे. प्रयोगशाळेसाठी १० लाख रुपये, अपघातग्रस्त शस्त्रक्रिया व उपचार केंद्रासाठी ७८ लाख रुपये, डायलेसीस युनिटसाठी ४० लाख रुपये, रेडीओलॉजी विभागाकडे ११ कोटी १५ लाख, नवजात बाळांच्या विभागासाठी १० लाख २० हजार, नेत्रविकार विभागासाठी ३३ लाख, कान-नाक-घसा विभागासाठी १८ लाख ४० हजार, फिजिओथेरपीकडे ५.५ लाख, दंत विकार विभागासाठी ८ लाख रुपये, शस्त्रक्रिया विभागासाठी ११ लाख, मेडिकल व सर्जीकल वॉर्डासाठी उपकरणे व फर्निचर दोन कोटी ६९ लाख रुपये, औषध खरेदी ३ कोटी रुपये असा खर्च येणार आहे.


हॉस्पिटल ३५० खाटांचे करण्यास नवीन वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ, परिचारीका, कर्मचारी नेमावे लागणार आहेत. त्यांचा खर्चसुद्धा पाच कोटी ६० लाख रुपये आहे. त्यामध्ये डॉक्टरांपासून शिंपी, प्लंबर, न्हावी, सुतार, ड्रायव्हर, याशिवाय चतुर्थ श्रेणीतील १३९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

इमारत दुरूस्तीसाठी
३.५ कोटी

सध्याची ‘आयजीएम’ ची इमारत व तिच्याकडील विजेचे फिटींग-सॅनिटेशन व्यवस्था वीस वर्षांपूर्वीची असल्याने ती अत्यंत खराब झाली आहे. म्हणून इमारत दुरूस्ती, विजेचे फिटींग, सॅनिटेशन, आदींवर ३.५ कोटी रुपये खर्चावे लागणार आहे. तर इतर खर्च ६८ लाख रुपये होणार आहे.

Web Title: Improve the health of IGM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.