व्हिडीओ गेम पार्लरवर छापे
By Admin | Updated: November 25, 2015 01:01 IST2015-11-25T00:59:10+5:302015-11-25T01:01:57+5:30
दीडशे जणांना अटक : लाखोंची रोकड जप्त; कोल्हापुरात कारवाई

व्हिडीओ गेम पार्लरवर छापे
कोल्हापूर : शहरात लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व जुना राजवाडा परिसरातील तीन व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापे टाकले. यावेळी जुगार खेळणाऱ्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली. यावेळी पोलिसांनी तिन्ही ठिकाणांहून लाखोंची रोकड जप्त केली. अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर शहरातील बहुतांश व्हिडीओ पार्लर बंद करण्यात आले.
शहरातील काही व्हिडीओ गेम पार्लरमध्ये हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे जुगार सुरू असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडे नागरिकांनी केली होती.
त्यानुसार चैतन्या यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला घेऊन मंगळवारी रात्री एकाच वेळी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या व्हिडीओ पार्लरवर छापे टाकले. अचानक पडलेल्या छाप्यांनी जुगार खेळणारे भांबावून गेले. दरम्यान, आपल्या हद्दीत छापे पडल्याची चाहूल लागताच तिन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्या यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना व्हिडीओ पार्लरचे मालक, कर्मचारी व जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईने शहरातील व्हिडीओ गेम पार्लर मालकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईनंतर घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)
‘लक्ष्मीपुरी’चे प्रवेशद्वार केले बंद
लक्ष्मीपुरी हद्दीतील क्लासिक व्हिडीओ गेम पार्लरमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास स्वत: अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी छापा टाकला. यावेळी पार्लरमध्ये सुमारे ४० तरुण जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांचा फौजफाटा पाहून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली. त्यानंतर संशयित आरोपींना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी आरोपी व त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराची गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. गर्दीचा फायदा घेत संशयित पळून जातील म्हणून पोलिसांनी नातेवाइकांना पिटाळून लावत पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद करून घेतला. मध्यरात्रीपर्यंत हा दरवाजा बंद होता. आतमध्ये आरोपींचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. मित्रपरिवार व नातेवाईक पुन्हा पोलीस ठाण्यासमोर येऊन आपल्या आप्तेष्टांची प्रतीक्षा करीत होते.