रुग्णासाठी डॉक्टरइतकीच नर्स महत्त्वाची राज्यपालांचे गौरवोद््गार
By Admin | Updated: May 8, 2014 12:07 IST2014-05-08T12:07:32+5:302014-05-08T12:07:32+5:30
बेल एअर नर्सिंग कॉलेजला तीन लाखांची देणगी जाहीर

रुग्णासाठी डॉक्टरइतकीच नर्स महत्त्वाची राज्यपालांचे गौरवोद््गार
पाचगणी : ‘नर्सेसना रुग्णाबरोबर थांबावे लागते. त्याची सेवा करावी लागते. त्यामुळे रुग्णाला डॉक्टरपेक्षा नर्सेस महत्त्वाच्या वाटतात. रुग्णसेवेबरोबरच त्याला मानसिक आधार देणार्या नर्सेसचे काम डॉक्टरइतकेच महत्त्वाचे असून, बेल एअर नर्सिंग कॉलेज चांगल्या नर्सेस घडविण्यात देशात आघाडीवर असल्याचे मला कौतुक वाटते,’ असे प्रशंसोद््गार राज्यपाल तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष के. आर. नारायणन यांनी काढले. महाविद्यालयासाठी तीन लाख रुपयांची देणगीही त्यांनी जाहीर केली. रेडक्रॉस सोसायटीच्या १५१ व्या वधापनदिनानिमित्त ‘माय स्टोरी’ हा सप्ताह २ ते ८ मे या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्यपाल के. आर. नारायणन यांनी बेल एअर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कºहाडकर, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, फादर टॉमी, फादर ब्ेनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव धस आदी मान्यवर उपस्थित होते. के. आर. नारायणन म्हणाले, ‘नर्सिंग हे सेवाभावी काम असल्याने त्याला वैद्यकक्षेत्रात फार महत्त्व आहे. केरळ राज्याप्रमाणेच बेल एअर नर्सिंग कॉलेजमध्ये इतर राज्यातील विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असल्याने हे कॉलेज ‘मिनी इंडिया’ बनले आहे. एकमेकांच्या सहवासातून नर्सिंगची सेवाभावी वृत्ती वाढण्यास मदत होणार असून, या कॉलेजची काम करण्याची पद्धती, वातावरण आणि विद्यार्थिनींना शिक्षणात मिळत असलेला आनंद पाहून मलाही मनोमन आनंद झाला आहे. बेल एअर नर्सिंग कॉलेज पाचगणीमधून जागतिक दर्जाचे शिक्षण देत असून इतर नर्सिंग कॉलेजनी बेल एअरचे अनुकरण केले पाहिजे.’ ‘रेडक्रॉस’च्या सचिव हुमायू मोदी म्हणाल्या, ‘गेल्या आठ वर्षांच्या काळात या कॉलेजने फार मोठी प्रगती साधली आहे. संशोधन प्रकल्पामुळे या कॉलेजचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढणार आहे. लवकरच वाई परिसरात अद्ययावत रुग्णालयाची उभारणी करून ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले जाणार आहे. यावेळी राज्यपालांनी काही विद्यार्थिनींशी मल्याळम भाषेत संवाद साधला. कॉलेजविषयी माहिती विचारली. विद्यार्थिनींनी कॉलेजच्या प्रशासनाची, शिस्तीची, उपक्रमांची माहिती दिली. राज्यपालांनी बेल एअर रुग्णालयातील प्रयोगशाळा, ओपीडी, निसर्गोपचार केंद्र, मसाज केंद्र, फार्मसी कार्यालय, डेअरी प्रकल्प आदी विभागांना भेटी दिल्या; तसेच एचआयव्ही बाधित रुग्णांशी संवाद साधला. यावेळी महाबळेश्वरचे मुख्याधिकारी सचिन पवार, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित होस्तानी, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, बेल एअर नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या लुई मेरी, फादर विल्सन, रेडक्रॉसचे जतीन उपस्थित होते. (वार्ताहर)