ग्राम विकासाचा पंचवार्षिक आराखडा राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:04+5:302021-01-25T04:24:04+5:30
कोल्हापूर : मतदारांनी विश्वासाने निवडून दिले आहे. हा विश्वास जपत असताना विकासाची कामे करा. पुढील पाच वर्षात गावचा विकास ...

ग्राम विकासाचा पंचवार्षिक आराखडा राबवा
कोल्हापूर : मतदारांनी विश्वासाने निवडून दिले आहे. हा विश्वास जपत असताना विकासाची कामे करा. पुढील पाच वर्षात गावचा विकास कशा पध्दतीने कारायचा, याचा पंचवार्षिक आराखडा तयार करा. भविष्यात त्यासाठी लागेल तेवढी मदत करण्याची आपली भूमिका राहील, अशी ग्वाही जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी येथे बोलताना दिले.
काेल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा कॉंग्रेसतर्फे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या सत्कार सोहळ्यास ९९८ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षास चांगले यश मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला असल्याचे या समारंभातून जाणवले.
लोकशाहीत चांगले यश मिळत असते, पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. निवडून आल्यानंतर आता जबाबदारीत वाढ झाली आहे. गावाचा विकास हेच ध्येय ठेवून काम करावे. ज्यांनी मते दिली नाहीत त्यांच्याबद्दल कटुता न ठेवता त्यांचीही कामे करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
ग्रामपंचायत हा लोकशाहीची पहिली पायरी आहे. तुम्ही निर्णय घेतलाच आहे, त्यामुळे गावच्या विकासाची, लोकांची कामे करण्याची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही. गावच्या विकासासह वैद्यकीय सुविधा, उपचार याबाबत काहीही गरज लागली तरी आम्ही मदत करायला तयार आहोत. लोकांची कोणतीही कामे असतील तर घेऊन या, असा विश्वासही त्यांनी सदस्यांना दिला.
-हरित गाव योजना राबवा -
हरित गाव योजना राबविण्यात सदस्यांनी पुढाकार घ्यावा. माहिती तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक चांगल्या कामासाठी करुन घ्यावा. शासनाच्या योजना गावांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
-कार्यक्रम होऊ देऊ नका
मासिक सभा असो अथवा शासकीय योजना, सर्वच कामांची नीट माहिती घ्या. अभ्यास करा. प्रोसिडिंग वाचून सह्या करा. अन्यथा ग्रामसेवक सही, शिक्के मारून तुमचा कार्यक्रम करील. ग्रामसेवक प्रोसिडिंग घराकडे घेऊन जाणार नाही याची खात्री करा. तुमचा कार्यक्रम करून देऊ नका, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
- आता गोकूळ, केडीसीसी -
जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या बाजूने लागत असलेले निकाल पाहता यापुढील गोकूळ दूध संघ, केडीसीसी बँक निवडणुकीतही ही घोडदौड कोणाला रोखता येणे शक्य नाही, असे आमदार जयंत आसगावकर म्हणाले.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे यांच्यासह ज्योत्स्ना युवराज पाटील, तेजस्विनी अभिजित पाटील यांची भाषणे झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील संग्रामसिंह नलवडे उपस्थित होते.