टाकाळा खणीचे पुनर्भरण लवकरच
By Admin | Updated: November 26, 2015 00:31 IST2015-11-26T00:31:42+5:302015-11-26T00:31:42+5:30
‘झूम’मधील डोंगर हटणार : कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्यास मदत

टाकाळा खणीचे पुनर्भरण लवकरच
कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाबरोबरच आता झूम प्रकल्पावर साचून राहिलेला आणि विघटन न होणाऱ्या (इनर्ट मटेरियल) कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विघटन न होणाऱ्या कचऱ्याद्वारे टाकाळा येथील खणीचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणारा हा कोल्हापुरातील पहिलाच प्रयोग असल्याने तो यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
शहरात दररोज १६० ते १७० टन कचरा निर्माण होत असून, त्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावावी, हा गहन प्रश्न मनपा आरोग्य विभागासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने टोप येथील मोठी खण राज्य सरकारकडून मालकी हक्काने मिळविली; परंतु त्यास स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने आणि हे प्रकरण हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तोपर्यंत मध्य मार्ग म्हणून शहरातीलच टाकाळा खणीची जागा घेण्यात आली आहे. याही खणीत कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्यासाठी आंदोलनही झाले. काही गोष्टींची हमी दिल्यानंतर आंदोलन थांबविले गेले.
आता टाकाळा खणीत विघटन न होणारा कचरा टाकला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण खणीभोवती सिमेंटची भिंत उभी करण्यात आली आहे. या खणीत कचरा टाकण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे बेड तयार करण्यात येणार आहेत. तसेच त्यातून काही प्रसंगी गॅस तयार झाला तर तो बाहेर पडण्यासाठी पाईप टाकल्या जाणार आहेत. कचऱ्याचा एक थर झाल्यानंतर त्यावर मुरुमाचा थर अंथरण्यात येऊन त्यावर रोलिंग केले जाणार आहे. त्यामुळे खणीचे पुनर्भरण व्यवस्थित होण्यास मदत होईल. पुनर्भरण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी करावी लागणारी अनुषंगिक कामे सध्या सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहेत.
कसबा बावड्यालगत असलेल्या झूम प्रकल्पावर सुमारे चार लाख टन कचरा साचून राहिला असून, त्यातील सुमारे दोन ते अडीच लाख टन कचरा हा विघटन न होणारा, तसेच पुनर्भरणास योग्य असलेला कचरा आहे.