उद्योजकांना कर्नाटकात तत्काळ जागा

By Admin | Updated: July 2, 2015 00:44 IST2015-07-02T00:41:05+5:302015-07-02T00:44:29+5:30

३०० उद्योगधंद्यांची माहिती मागविली : कर्नाटक इंडस्ट्रियल बोर्डाचे अधिकारी आणि कोल्हापूरच्या उद्योजकांची ‘गोशिमा’त बैठक

The immediate place for entrepreneurs in Karnataka | उद्योजकांना कर्नाटकात तत्काळ जागा

उद्योजकांना कर्नाटकात तत्काळ जागा

शिरोली : महाराष्ट्रातील ३०० उद्योजकांना कर्नाटकमधील कणंगला (तवंदीघाटा शेजारी) येथे तत्काळ जागा देण्याचे कर्नाटक शासनाने जाहीर केले आहे. त्याबाबतचे कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्डाने गोशिमा कार्यालयाला पत्रही पाठविले आहे. याबाबत बुधवारी कर्नाटक इंडस्ट्रियल बोर्डाचे अधिकारी आणि कोल्हापूरचे उद्योजक यांची ‘गोशिमा’त बैठक झाली.
कर्नाटकमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या ३०० उद्योजकांची यादीच कर्नाटक इंडस्ट्रियल बोर्डाने गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनकडे (गोशिमा) मागविली आहे. तसेच याबाबत बुधवारी (दि. १) जुलैला गोशिमाच्या सभागृहात उद्योजक आणि कर्नाटक इंडस्ट्रियल बोर्डाचे सचिव रत्नप्रभा अधिकारी प्रकाशदेव यांची बैठक झाली.
रत्नप्रभा म्हणाल्या, उद्योजकांना मागणीनुसार तवंदी घाटाच्या पूर्वेस कणंगला येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. जागा ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, उद्योजकांना लवकरच जागा देऊ, विजापूर आणि निपाणी येथे औद्योगिक वसाहती स्थापनेचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. त्यामुळे येथे तत्काळ औद्योगिक वसाहत उभी करायची आहे आणि इच्छुक ३०० उद्योजकांची यादी द्यावी. उद्योजकांना ९९ वर्षांच्या कराराने अल्पदरात जागा देणार आहे. तत्काळ वीज मंजूर, सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज, पाणी या सुविधा आणि औद्योगिक करातही सूट देण्यात येणार असल्याचे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बोर्डाचे अधिकारी प्रकाशराव यांनी सांगितले. यासाठी बेळगाव येथील इंडस्ट्रिलय बोर्ड येथे मंगळवार ७ जुलै रोजी बैठक होणार असून बैठकीला कोल्हापूरचे उद्योजक या जाणार आहेत. बैठकीला गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी, उपाध्यक्ष संजय उरमनट्टी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, संचालक आर. पी. पाटील, जे. आर. मोटवानी, सुरजित पोवार, लक्ष्मणदास पटेल उपस्थित होते. (वार्ताहर)


महाराष्ट्र शासनाकडून निर्णय न झाल्याने कर्नाटकमध्ये जाणार
महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आणि सध्याच्या भाजप-शिवसेना युतीकडेही राज्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडवा, विजेचे दर कमी करा, उद्योजकांना उद्योगविस्तारासाठी जागा द्या, इंडस्ट्रियलचे प्रलंबित प्रश्न, सध्याची होऊ घातलेली हद्दवाढ यासारख्या बऱ्याच अडचणी शासनाकडे वारंवार मांडल्या; पण कोणताही निर्णय झाला नाही. यामुळेच कर्नाटक शासनाने निमंत्रण दिले असून, आम्ही कर्नाटकमध्ये जाणार, असे उद्योजकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून गोशिमाच्या माध्यमातून कर्नाटकमध्ये जाण्याचा आमचा जो प्रयत्न होता, तो आज यशस्वी झाला आहे. कर्नाटकमधील तवंदी घाटात कणंगला येथे एक हजार एकर जागा उपलब्ध झाली आहे आणि ३०० उद्योजकांना तत्काळ जागा देतो, असे पत्र कर्नाटक शासनाने गोशिमाला पाठविले आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये जाणार आहे.
- उदय दुधाणे,
माजी अध्यक्ष, गोशिमा.

महाराष्ट्र शासन कोणताही निर्णय घेत नाही, या ठिकाणी वीज महाग आहे. जागा उपलब्ध नाही आणि शहराची हद्दवाढ यामुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. कर्नाटक शासनाने आम्हाला जागा देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची कर्नाटक इंडस्ट्रियल बोर्ड आणि उद्योजकांनी सकारात्मक बैठकही ‘गोशिमा’मध्ये झाली.
- आर. पी. पाटील,
संचालक, गोशिमा.

Web Title: The immediate place for entrepreneurs in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.