‘मी रंकाळा... भोगतो आहे मरणकळा...!’
By Admin | Updated: December 22, 2014 00:16 IST2014-12-22T00:13:15+5:302014-12-22T00:16:12+5:30
अनोखे आंदोलन : कडाक्याच्या थंडीत मुलांचा ‘रंकाळा बचाव’ निर्धार

‘मी रंकाळा... भोगतो आहे मरणकळा...!’
कोल्हापूर : रंकाळ्याचे दुखणे दिवसेंदिवस वाढत आहे. हे दुखणे मांडण्यासाठी आज, रविवारी सकाळी साडेसात वाजता कडाक्याच्या थंडीत लहान मुलांनी रंकाळ्याच्या पाण्यात उभे राहून ‘मी रंकाळा... भोगतो आहे मरणकळा...’ ही कविता म्हटली. या शालेय विद्यार्थ्यांनी रंकाळा वाचविण्याचा निर्धार केला. या अनोख्या आंदोलनाचे नियोजन रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती, गुलमोहर ग्रुप, रंकाळा पदपथ व रंकाळाप्रेमींतर्फे यशवंत भालकर यांनी केले. विद्यार्थ्यांचा पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. संवर्धन समितीने यापूर्वी ‘एक हाक रंकाळ्यासाठी’ हा उपक्रम राबविला होता. रंकाळा तलावाची दुरवस्था रोखण्यासाठी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि. २५) ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’ साजरा होणार आहे. सकाळी साडेसात वाजता रंकाळा चौपाटी येथील नवनाथ मंदिराजवळ एकत्र येऊन मुक्त व्यासपीठावर रंकाळ्याविषयी कविता, प्रदूषणमुक्तीबाबत उपाय, सूचना, तसेच तलावाबाबतच्या आठवणी व घटना, आदींचे मनोगत नागरिक उत्स्फूर्तपणे व्यक्त करणार आहेत.‘ रंकाळ्याचे गाऱ्हाणे’ मी रंकाळा... मी रंकाळा... भोगतो आहे मरणकळा... ढासळत चालली तटबंदी पाण्यालाही दुर्गंधी. माझा निळा रंग गेला चौबाजूंनी मैला आला. आम्ही लढू प्राणपणाने वाचविण्या रंकाळा उघडा डोळे प्रशासनाचे मरतो आहे रंकाळा... मी रंकाळा... मी रंकाळा... भोगतो आहे मरणकळा... कवी- यशवंत भालकर