बेकायदेशीर ३६ सिलिंडर जप्त
By Admin | Updated: August 17, 2014 01:04 IST2014-08-17T00:55:29+5:302014-08-17T01:04:30+5:30
६०० लिटर रॉकेल जप्त : सव्वा लाखाचा माल हस्तगत

बेकायदेशीर ३६ सिलिंडर जप्त
कोल्हापूर : शहरातील हॉटेल, हॉस्पिटल, बेकरी, स्वीट मार्ट आदी ठिकाणी छापा टाकून आज, शनिवारी घरगुती वापराऐवजी व्यवसायासाठी बेकायदेशीर वापर होत असलेली ३६ सिलिंडर पुरवठा विभागाने छापा टाकून जप्त केली. याबरोबरच माळकर तिकटी येथील लक्ष्मी नारायण फरसाणा केंद्रातून ६०० लिटर बेकायदेशीर साठा केलेले रॉकेलही जप्त केले. सुमारे सव्वा लाखाचा हा मुद्देमाल आहे.
घरगुती वापराच्या सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर होत असल्याच्या तक्रारीवरून आज शहर पुरवठा कार्यालयाने शहरात धडक मोहीम राबविली. यामध्ये ताह्मणकर हॉस्पिटल, हॉटेल आहार, हॉटेल न्यू सुदीन, हॉटेल सुनीलराज, हॉटेल मस्त पंजाबी, आपली आवड भजी सेंटर (मंगळवार पेठ), महालक्ष्मी उपाहारगृह, माउली लॉज (जोतिबा रोड), हॉटेल स्वाद (बिनखांबी गणेश मंदिर), मेवाड प्रेम चाट भांडार, हॉटेल रुचिरा (भवानी मंडप), हिंदुस्थान बेकरी (ताराबाई रोड), आदी ठिकाणी छापा टाकून सिलिंडर जप्त केली.
त्याचबरोबर भरवस्तीतील माळकर तिकटी येथील लक्ष्मी नारायण फरसाणा केंद्रावर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी बेकायदेशीरीत्या साठा केलेले ६०० लिटर रॉकेल व चार सिलिंडर जप्त करण्यात आली. एका बाजूला लोकांना रॉकेल मिळणे दुरापास्त झाले असताना दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉकेल आले कुठून? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. येथील मुद्देमाल २५ हजारांचा, तर उर्वरित एक लाख दहा हजार रुपयांचा आहे. ही धडक कारवाई इथून पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे शहर पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले.
ही कारवाई शहर पुरवठा अधिकारी डी. एम. सणगर यांच्या नेतृत्वाखाली शहर पुरवठा निरीक्षक सतीश ढेंगे, व्ही. एम. तोडकर, बी. बी. बोडके, बी. सी. खोत, राहुल धाडणकर, आदींनी केली. (प्रतिनिधी)